जानेवारी महिन्यात संपलेल्या १० महिन्यांत विदर्भातील २२८ शेतकऱ्यांनी शेतीच्या झालेल्या दुर्दशेला कंटाळून आत्महत्या केली, असे गुरुवारी संसदेत स्पष्ट करण्यात आले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ही माहिती राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली आहे.
तथापि, शेतीच्या दुर्दशेला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे, असेही पवार म्हणाले. २००६ मध्ये आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५५६ होती ती २०११ मध्ये ३४६ इतकी झाली. संपूर्ण महाराष्ट्रात २००६ मध्ये हीच संख्या १०३५ इतकी होती ती २०११ मध्ये ४८५ इतकी झाली, असेही कृषिमंत्री म्हणाले.
विदर्भासाठी पंतप्रधानांनी जे पॅकेज जाहीर केले त्याच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार झाल्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी, जे पुनर्वसन पॅकेजसाठी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांच्या निवडीसाठी राज्य सरकारने डिसेंबर २००९ मध्ये सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत, असे सांगितले.

Story img Loader