in-laws prick woman with hiv-infected needle Crime News : हुंडा घेणे हे कायद्याने गुन्हा आहे तरीही अनेकदा हुंड्यासाठी महिलांचा छळ केल्याच्या घटना समोर येत राहातात. उत्तर प्रदेशमध्ये हुंडा दिला नाही म्हणून सासरच्या लोकांनी महिलेला एचआयव्ही बाधित सुई टोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहारनपूरमधील न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना एका ३० वर्षीय महिलेच्या सासरच्या लोकांविरोधात फोजदारी गुन्हा दाखल करण्याचे आगेश दिले आहेत. महिलेचे आई-वडिल त्यांची हुंड्याची मागणी पूर्ण न करू शकल्याने सासरच्यांनी तिला एचआयव्ही बाधित सुईचे इंजेक्शन दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहारणपूरचे एसपी (ग्रामीण) सागर जैन यांनी सांगितले की, पीडित महिला ही सहरणपूरची रहिवासी आहे. आम्ही तिचा नवरा (३२), दीर (३८), नणंद (३५) आणि सासू (५६) यांच्याविरोधात आयपीसी कलम ३०७, ४९८ए, ३२३, ३२८, ४०६ आणि हुंड्यासंबंधी इतर कलमांच्या आधारे गंगोह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आम्ही या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहोत असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपानुसार ही घटना महिलेच्या हरिद्वार येथील सासरच्या घरी मे २०२४ मध्ये घडली.

नेमकं काय झालं?

महिलेच्या वडिलांनी न्यायालयात सांगितेल की, “त्यांनी त्यांच्या मुलीचे फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न लावून दिले होते, ज्यावर त्यांनी ४५ लाख रुपये खर्च केले. ते म्हणाले की, “आम्ही सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि १५ लाखांची रोकड नवरदेवाच्या कुटुंबियांना दिली, पण ते आणखी १० लाख आणि मोठ्या एसयू्व्हीची मागणी करत होते”.

त्यांनी (पीडितेच्या सासरच्यांनी) लग्न झाल्यानंतर लगेचच तिचा छळ करायला सुरुवात केली. त्यांनी माझ्या मुलीचा अपमान केला आणि तिला असेही सांगितले की ते त्यांच्या मुलासाठी दुसरी बायको आणतील. २५ मार्च २०२३ रोजी तिला घरातून हाकलून लावण्यात आले आणि गावची पंचायत हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत ती पुढील तीन महिने आमच्याबरोबर राहिली. त्यानंतर तिला तिच्या पतीच्या घरी परत पाठवण्यात आले आणि त्यानंतर लगेच तिचा पुन्हा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला, असे वडिलांनी त्यांच्या पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

पीडितेच्या वडिलांना दावा केला की जेव्हा ते पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेले तेव्हा गंगोह पोलिस ठाण्यातील अधिकारी (एसएचओ) रोगेंट त्यागी यांनी त्यांना पहिल्यांदा वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी सहारनपूरचे एसएसपी रोहित सिंह साजवान यांच्याशी संपर्क केला, पण त्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले असे महिलेच्या वडिलांनी आपल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने पीडितेचे कुटुंब अखेर न्यायालयात गेले.

मे २०२४ मध्ये तिच्या सासरच्यांनी तिला जबरदस्तीने एचआयव्ही बाधित सिरिंजने इंजेक्शन दिले आणि त्यानंतर तिची तब्येत वेगाने ढासळू लागली . वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले, तर तिचा पती एचआयव्ही-निगेटिव्ह आढळला, असेही पुढे तक्रारीत सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In laws inject woman with hiv infected needle after family fails to meet dowry demands crime news rak