मध्य प्रदेशमधील आयएएस अधिकारी शैलबाला मार्टीन पुन्हा एकदा त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी आता एक्स या समजामाध्यमावर पोस्ट करत मंदिरांवरील लाऊड स्पीकरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानानंतर आता हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिक घेतली असून त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर काँग्रेसने या विधानाचं समर्थन करत त्यात चुकीचं काय? असा प्रश्न विचारला आहे.
नेमकं काय घडलं?
मध्य प्रदेशमधील ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावर बोलताना एका युजरने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत मशिंदींवरील लाऊडस्पीकरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदुषण होत असून मुस्लिमांनी समजदारी दाखवत हे लाऊडस्पीकर काढून टाकावे, असं तो म्हणाला. या पोस्टवरच उत्तर देताना, मग मंदिरावरील लाऊड स्पीकरचं काय? या लाऊड स्पीकरमुळेही मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होतं. मंदिरांवरील लाऊड स्पीकर मध्यरात्रीपर्यंत वाजतात, तेव्हा कुणाला त्रास होत नाही का? अशी प्रतिक्रिया शैलबाला मार्टीन यांनी दिली.
हेही वाचा – Bulandshahr Cylinder Blast : घरात सिलिंडर फुटला; स्फोटाच्या धक्क्याने घर कोसळलं, एका महिलेसह ५ जण ठार
शैलबाला मार्टीन यांच्या विधानावर हिंदुत्त्ववादी संघटनांचा आक्षेप
शैलबाला मार्टीन यांच्या या विधानावर आता हिंदुत्त्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. संस्कृती बचाव मंचाचे अध्यक्ष पंडित चंद्रशेखर तिवारी यांनी शैलबाला मार्टीन यांचं विधान हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारं असल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. मंदिरांमध्ये मधूर आवाजात आरती आणि मंत्रांचे उच्चारण होते. तिथे मशिंदींसारखं पाच वेळा मोठ्या आवाजात अजान होत नाही. त्यामुळे शैलबाला मार्टीन यांचे विधान हिंदूंच्या भावना दुखावणारं आहे, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना, शैलबाला मार्टीन यांनी कधी मोहरमच्या यात्रेवर दगडफेक होताना बघितली आहे का? पण हिंदूंच्या यात्रांवर अनेकदा दगडफेक झाली आहे. त्यामुळे माझं त्यांना इतकंच सांगणं आहे की त्यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावू नये. त्यांना हा अधिकार नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – Tahawwur Rana Extradiction : २६/११ मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा डिसेंबर अखेरीस भारताच्या ताब्यात?
काँग्रेस नेत्यांनीही दिली प्रतिक्रिया
दरम्यान, यासंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांनीही भाष्य केलं. शैलबाला मार्टीन काहीही चुकीचं बोलल्या नाही. भाजपाच्या सरकारकडून धर्म बघून लाऊड स्पीकरवर कारवाई केली जाते. त्यामुळेच मध्यप्रदेश प्रशासनातील अधिकाऱ्यांवर सार्वजनिकरित्या बोलण्याची वेळ आली आहे, असं काँग्रेस प्रवक्ते अब्बास हफीज म्हणाले.