Madhya Pradesh : परजातीतल्या मुलाशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून वडिलाने स्वत:च्या १८ वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १५ ऑगस्ट रोजी मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये ही घटना घडली. मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी वडिलाने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहा महिन्यापूर्वी घरातून पळून गेली होती तरुणी

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मृतक मुलीचे शिवपुरी येथे राहणाऱ्या एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. तसेच तिला त्याच्याशी विवाह करायचा होता. मात्र, तो परजातीतला असल्याने मुलीच्या वडिलांनी त्याला विरोध केला. त्यामुळे सहा महिन्यापूर्वी ती तिच्या प्रियकराबरोबर घरातून पळून गेली होती. याप्रकरणी मुलीच्या वडिलाने पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.

हेही वाचा – Madhya Pradesh : आरोग्य केंद्रात ना रुग्णवाहिका, ना डॉक्टर-परिचारिका, सफाई कर्मचाऱ्याच्या मदतीने प्रसूती, बाळ दगावलं

वडिलांनी मुलीचा गळा आवळत केली हत्या

वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी १४ ऑगस्टरोजी तिला उदयपूरमधून ताब्यात घेतला होते. तसेच १५ ऑगस्ट रोजी तिला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले. घरी आल्यानंतर वडिलांनी पुन्हा तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही मुलगी प्रियकराबरोबर लग्न लाऊन देण्याची मागणी करत होती. तसेच तिने वडिलांना पुन्हा घरातून पळून जाण्याची धमकीही दिली. यावरून तिचा वडिलांशी वाद झाला. या वादातूनच वडिलांनी मुलीचा गळा आवळत तिची हत्या केली. यावेळी मुलीच्या आईने तिच्या वडिलांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्याचा कोणताही फायदा झाला नाही.

हेही वाचा – वर्गात मोबाईल आणला म्हणून शिक्षिकेनं विद्यार्थिनींना निर्वस्त्र करत…; संतापजनक घटना समोर!

स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन केलं आत्मसमर्पण

दरम्यान, मुलीच्या हत्येनंतर आरोपी वडिलांनी स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. तसेच पोलिसांना मुलीच्या हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In madhya pradesh man kills his daughter over inter caste love affair arrested spb