पश्चिम बंगालवर एकहाती सत्ता मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चुरशीची टक्कर असल्याचे सांगितले जात होते, परंतु ममता यांच्या नेतृत्वात त्यांच्या पक्षाने सर्व अंदाज खोटे ठरवत २९२ पैकी २३१ जागा जिंकल्या. भाजपाला केवळ ७७ जागा मिळाल्या. ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान त्यांचा पक्ष तृणमल कॉंग्रेसच्या ४३ सदस्यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल जगदीप धनकर यांनी सदस्यांना मंत्रीपदाची शपथ दिली.
राजभवनात कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सर्व कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभारी, राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली, या दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील येथे उपस्थित होत्या. मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये अमित मित्रासारख्या मोठ्या नावांचा समावेश असून, क्रिकेटपटू-राजकारणी असलेले मनोज तिवारी यांनाही मंत्रीपद मिळालं आहे. लवकरच मंत्रिमंडळातील विभागांचे विभाजन केले जाईल.
Kolkata: 43 TMC leaders sworn-in as ministers in West Bengal cabinet pic.twitter.com/FRIZL5eUJx
— ANI (@ANI) May 10, 2021
शपथविधी झालेल्या ४३ सदस्यांपैकी २४ पूर्ण मंत्री, १९ राज्यमंत्री आणि १० स्वतंत्र पदावर कार्यरत आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी, भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांचे प्रतिरोधक अखिल गिरी, ज्येष्ठ नेते बिप्लब मित्र आणि माजी आयपीएस अधिकारी हुमायून कबीर हे नव्या सरकारमधील १६ नव्या चेहर्यांमध्ये आहेत.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच ममता बॅनर्जींकडून राज्यात मोठे बदल
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लगेचच सूत्रं हातात घेत पोलीस प्रशासनात मोठे बदल केले आहेत. ममता बॅनर्जी यांनी जवळपास २९ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली केली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या आधी या अधिकाऱ्यांची बदली केली होती. ज्या पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा राज्यात आणण्यात आलं आहे त्यामध्ये महासंचालक विरेंद्र, अतिरिक्त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) जावेद शमीम आणि महासंचालक (सुरक्षा) विवेक सहाय यांचा समावेश आहे.