अरुणाचल प्रदेशच्या ११ गावांचं नामकरण करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आला होता. यावरून भारत आणि चीन यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. चीनला नामोहरण करण्याकरता भारताकडून विविध उपाय आखले जात आहेत. याकरता जी-२० ची बैठकही लेह येथे आयोजित करण्यात आली. आता, अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथे हिमालयी क्षेत्रात वरिष्ठ बौद्ध नेत्यांचं राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संम्मेलनात मुख्यमंत्री पेमा खांडू सुद्धा उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे चीनचा ज्या मठावर डोळा आहे त्याच गावात हे संमेलन आयोजित करण्यात आल्याने भारताने चीनला सूचक इशारा दिला आहे, असं म्हटलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टर येथे जेमीथांगमध्ये गोरसाम स्तूप येथे नालंदा बौद्ध परंपरेचे एक दिवसीय राष्ट्रीय संमेलन सोमवारी आयोजित करण्यात आले होते. हिमालयीन क्षेत्रात एवढ्या मोठ्या संख्येने बौद्ध नेत्यांनी एकत्र येणं ही फार दुर्मिळ घटना मानली जात आहे. ज्या जेमीथांग गावात हे संमेलन झाले ते गाव भारत-चीन सीमेतील शेवटचं गाव आहे. या संमेलनात जवळपास ६०० बौद्ध प्रतिनिधी उपस्थित होते. हिमालय क्षेत्रात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा >> अतिक-अशरफच्या हत्येपूर्वी मारेकऱ्यांनी केली होती रेकी, पोलिसांच्या हाती लागलं सीसीटीव्ही फुटेज, ‘असा’ रचलेला कट

येथे असलेल्या तवांग मठामुळे हे संमेलन महत्त्वाचं आहे. अरुणाचलच्या तवांग येथे तिब्बती बौद्ध धर्माचा दुसरा मोठा मठ आहे. पाचवे दलाई लामा यांच्या सन्मानार्थ १६८०-८१ मध्ये मेराग लोद्रो ग्यामत्सो यांनी या मठाची स्थापना केली होती. तवांग मठ आणि तिब्बतच्या ल्हासा येथील मठ यांना ऐतिहासिक संदर्भ आहेत.

चीनचा मठावर डोळा का?

येथील मोनपा आदिवासी समाज तिब्बती बौद्ध धर्माचा पुरस्कार करते. मात्र, चीनकडून ही संस्कृती मिटवण्याचा प्रयत्न होत आहे. येथील तिब्बती बौद्ध धर्माची संस्कृती नष्ट केल्यास ही जागा आपल्या ताब्यात येईल, अशी चीनची धारणा आहे. म्हणूनच, या गावात चिनी नागरिकांच्या वस्त्या उभारल्या जात आहेत.

चिनी वस्त्या या गावांत उभारल्या जात असल्या तरीही तवांग मठावर अद्यापही चीनने आक्रमण केलेलं नाही. परंतु, तवांगमधील हे मठ ताब्यात घेतल्याशिवाय येथील संस्कृती नष्ट करता येणार नाही, अशी चीनची मानसिकता आहे. म्हणूनच चीनचा या भागाकडे अधिक डोळा आहे.

दरम्यान, ९ डिसेंबर २०२२ मध्ये चीनच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथे घुसण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, भारतीय लष्कराच्या सतर्कतेमुळे चीनी सैन्य माघारी फिरले. म्हणूनच, या ठिकाणी बौद्ध नेत्यांचं राष्ट्रीय संमेलन आयोजित केल्याने भारताने चीनला सूचक इशारा दिला असल्याचं म्हटलं जातंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In message to china top himalayan buddhist leaders hold meet in arunachal pradeshs tawang sector sgk
Show comments