भारतात सणावाराला गायी, बैल आणि नागाची पूजा करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे नेपाळमध्ये दिवाळीला कुत्र्याची पूजा करण्याची प्रथा आहे. याला ‘कुक्कुर तिहार’ असे म्हटले जाते. भारताप्रमाणेच नेपाळमध्येही मोठया प्रमाणावर हिंदू असून ते दिवाळी सणाला कुत्र्याची पूजा करतात. नेपाळमध्ये दिवाळीला तिहार म्हटले जाते. तिहारच्या दुसऱ्या दिवशी कुत्र्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. कुक्कुर तिहारच्या निमित्ताने कुत्र्यांचे जे पौराणिक महत्व आहे त्याचे स्मरण केले जाते.
श्वान हा कुत्र्याचे संस्कृत नाव असून वेदांमध्ये त्याचा उल्लेख आहे. कुक्कुर तिहारला कुत्र्यांना ओवाळून ताज्या फुलांचा हार करुन त्यांच्या गळयात घातला जातो. पाळीव श्वान असो रस्त्यावरचा कुत्रा सर्वांनाच त्यादिवशी एकसमान वागणूक दिली जाते.
People in Nepal celebrate ‘Kukkur Tihar’ as a part of their 5-day long #Diwali celebrations. Visuals from Kathmandu. pic.twitter.com/V944usyVg6
— ANI (@ANI) November 6, 2018
कुत्रा प्रामाणिक, इमानी प्राणी म्हणून ओळखला जातो. पौराणिक काळापासूनचे अनेक संदर्भ सापडतील ज्यामध्ये कुत्र्याने माणसाला साथ दिली आहे. घरात एखादा प्राणी पाळण्याचा विषय येतो तेव्हा माणसाची पहिली पसंती कुत्र्यालाच असते. घर राखण्यापासून ते चोराला शोधून काढण्यापर्यंत माणसाला कुत्र्याची मदत होते. भारतात कुत्र्याची पूजा करण्याची पद्धत नाही पण नेपाळमध्ये दिवाळी सणाच्या निमित्ताने कुत्र्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.