पीटीआय, भुवनेश्वर
ओडिशाच्या विधानसभेत मंगळवारी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेसच्या आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला हा प्रकार घडला. यामुळे सभागृहाचे कामकाज अनेकवेळा तहकूब करण्यात आले.
प्रश्नोत्तराच्या तासाला बिजू जनता दल आणि काँग्रेसचे सदस्य गोंधळ घालत होते. त्या गोंधळातच नगरविकास मंत्री के सी मोहपात्रा हे प्रश्नाचे उत्तर देत होते. काँग्रेस आमदार ताराप्रसाद बहिनिपती हे मोहपात्रा यांच्यासमोर उभे होते. त्याचवेळी ज्येष्ठ भाजप आमदार जयनारायण मिश्रा यांनी बहिनीपती यांच्या दिशेने धाव घेतली. त्यापूर्वी बहिनीपती यांनी सभागृहाचे कामकाज थांबवण्यासाठी अध्यक्ष सुरामा पाध्य यांच्या आसनासमोरील व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मिश्रा यांनी आपली कॉलर धरून ढकलले असा आरोप बहिनीपती यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केला.
हा प्रयत्न अयशस्वी झाल्यांतर बहिनीपती हे मोहपात्रा यांच्या दिशने गेले आणि त्यांनी उत्तर देऊ नये असे सांगू लागले. भाजप आमदारांनीही अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली आणि तिथे आधीपासून घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांबरोबर धक्काबुक्की केली. बिजू जनता दलाचे आमदार धक्काबुक्कीत सहभागी नव्हते. हा गोंधळ वाढल्यानंतर अध्यक्षांनी आधी दुपारपर्यंत आणि त्यानंतर आणखी तीन वेळा सभागृहाचे कामकाज तहबूक केले.