नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते खिशात संविधानाची प्रत घेऊन हिंडत आहेत, त्यांना संविधान खिशात टाकून फिरायचीच सवय आहे. लहानपणापासून हीच शिकवण दिलेली असते. संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासण्याचे काम काँग्रेसनेच केले आहे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी संविधानाचा मूळ ढाचा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आता हेच काँग्रेसचे नेते संविधानाच्या रक्षणाचे धडे देत आहेत, अशा शेलकी शब्दांत केंद्रीय संरक्षणमंत्री व लोकसभेचे उपनेते राजनाथ सिंह यांनी काँग्रेसच्या ‘संविधान बचाओ’ आंदोलनाचे वाभाडे काढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सलग दोन दिवस संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संविधानावर चर्चा केली असून शुक्रवारी भाजपच्या वतीने राजनाथ सिंह यांनी चर्चेची सुरुवात केली. संसदेवर झालेल्या हल्ल्याला २३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहीद जवानांना आदरांजली वाहिली. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी सुमारे दीड तासाच्या भाषणामध्ये काँग्रेसने संविधान बदलण्याच्या कथित प्रयत्नांचा पाढा वाचला!

हेही वाचा : राजस्थान, जम्मू-काश्मीरमध्ये थंडीची लाट

जेव्हा जेव्हा सत्ता आणि संविधान यांच्यामध्ये एकाची निवड करण्याची वेळा आली तेव्हा काँग्रेसने सत्तेला प्राधान्य दिले. नेहरूंनी १७, इंदिरा गांधींनी २८, राजीव गांधींनी १०, तर मनमोहन सिंग यांनी संविधानामध्ये सात दुरुस्त्या केल्या. काँग्रेसने संविधानामध्ये केवळ दुरुस्त्याच केल्या नाहीत तर ते हळूहळू बदलण्याचा प्रयत्न केला, अशी टीका त्यांनी केली. १९७६ मध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश एच. आर. खन्ना यांनी काँग्रेस सरकारच्या विरोधात निकाल दिल्यामुळे ते सरन्यायाधीश होऊ शकले नाहीत, असे खन्नांचे म्हणणे होते, याचा उल्लेख राजनाथ यांनी केला. शाहबानो प्रकरणाचा संदर्भ देत राजनाथ म्हणाले की, आता ‘मोहब्बत की दुकान’ म्हणणाऱ्या या काँग्रेस नेत्यांकडे बघून हसू येते!

मनमानी निर्णय

काँग्रेसने संविधानाला कधीच महत्त्व दिले नाही असे सांगताना राजनाथ यांनी अनेक उदाहरणे दिली. तीन वरिष्ठ न्यायाधीशांना डावलून इंदिरा गांधींनी चौथ्या क्रमांकावरील न्यायाधीशाला सरन्यायाधीश केले. वेळोवेळी काँग्रेसने संविधानाचा अपमान केला आहे. डॉ. आंबेडकरांनी काँग्रेसच्या संविधानाची मूल्ये पायदळी तुडवण्याच्या वृत्तीचा विरोध केला होता, पण काँग्रेसने हीच परंपरा पुढेही चालू ठेवली. नेहरूंनी समान नागरी कायद्याला विरोध केला. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली, त्यांनीच ५० वेळा राज्य सरकारे बरखास्त केली. पण हेच काँग्रेस नेते संविधान धोक्यात असल्याचा आक्रोश करत आहेत, असा आक्रमक प्रहार राजनाथ यांनी केला.

हेही वाचा : रीमा कपूर यांनी “आदरणीय पंतप्रधानजी…” म्हणताच मोदींनी म्हटलं, “कट…”; कपूर कुटुंबीयांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

भाजप संविधान बदलू देणार नाही

जम्मू-काश्मीरसारख्या जिथे संविधान लागू होत नव्हेत तिथेही ते लागू केले. जीएसटीसारखा कायदा केला. नारीशक्तीचा कायदा करून महिलांचे सशक्तीकरण केले. राष्ट्रीय मागास आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. देशाच्या अखंडत्वासाठी, सामाजिक-आर्थिक विकासासाठी संविधानामध्ये योग्य दुरुस्त्या केल्या. भाजपने संविधानाचा नेहमीच सन्मान केला. धर्माचे अनेक अर्थ आहेत, त्यातील महत्त्वाचा अर्थ म्हणजे कर्तव्य. भाजपने संविधानरक्षणाचे कर्तव्य बजावले आहे. संविधान भाजपसाठी पवित्र ग्रंथ आहे, असे राजनाथ म्हणाले.

संविधानाच्या मूळ प्रतीच्या भाग-३ मध्ये राम, सीता आणि लक्ष्मण यांची चित्रे आहेत, अजंठा लेण्याचेही चित्र आहे, इतकेच नव्हे कमळाचे फूलही आहे. कित्येक शतकांच्या गुलामीतून देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे आणि भारतीय संस्कृती-परंपरांची ही चित्रे द्याोतक आहेत, असा मुद्दा राजनाथ यांनी अधोरेखित केला.

हेही वाचा : Allu Arjun : संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी कशी झाली? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम; म्हणाले, “अल्लू अर्जूनने हातवारे…”

मोदी गैरहजर

लोकसभेत संविधानावर चर्चा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित नव्हते. मोदी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळ्यासंदर्भातील कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. मोदींच्या गैरहजेरीचा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आवर्जून उल्लेख केला. पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत संविधानावरील चर्चेला अर्थ काय, असा प्रश्न यादव यांनी केला.

संविधान एका पक्षाने तयार केलेले नाही, ते एका पक्षाचेही नाही. तसे भासवण्याचा, संविधानावर पूर्णपणे कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. संविधानामध्ये संविधानसभेचे सदस्य नसलेल्या मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय, भगत सिंह, वीर सावरकर अशा अनेक व्यक्तींच्या संकल्पनांचा समावेश करण्यात आला आह. काँग्रेसने कधीही संविधानाचा सन्मान केला नाही, सांविधानिक संस्थांचे स्वातंत्र्य, स्वायत्तता कधीही मान्य केले .

  • राजनाथ सिंह, केंद्रीय संरक्षणमंत्री व लोकसभेचे उपनेते
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In parliament defense minister rajnath singh slam congress opposition on constitution issue css