खासदारांनी भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र होऊन पाकिस्तानला, त्यांच्याकडून होणाऱया दहशतवादी हल्ल्यांना आव्हान दिलं पाहिजे, या शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सभागृहातील सत्ताधारी सदस्यांना सुनावले. दहशतवादी हल्ल्यानंतर शहीद झालेल्यांना किंवा मृत पावलेल्यांना किती दिवस नुसती श्रद्धांजली वाहत बसणार, असा सवालही विरोधकानी गुरुवारी संसदेत उपस्थित केला.
श्रीनगरमधील बेमिना भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये बुधवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) पाच जवान शहीद झाले. या हल्ल्यात सात जवान जखमी झाले आहेत. या घटनेचे पडसाद गुरुवारी लोकसभेत उमटले. शून्य काळात या विषयावर बोलताना सुषमा स्वराज यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. दहशतवाद्यांकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून ते पाकिस्तानातून आल्याचे स्पष्ट झाले, याकडे स्वराज यांनी लक्ष वेधले. स्वराज बोलत असताना सत्ताधारी बाकांवरील काही खासदारांनी त्यांच्या मुद्द्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी आम्हाला आव्हान देण्यापेक्षा पाकिस्तानला द्या, या शब्दांत सत्ताधाऱयांचा समाचार घेतला. सातत्याने होणाऱया दहशतवादी हल्ल्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकार काय उपाययोजना करीत आहे, याची माहिती गृहमंत्र्यांनी द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Story img Loader