महाकुंभ नगर : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ- २०२५ चे आयोजन, वैश्विक कल्याण, विश्वशांती आणि तीर्थक्षेत्र प्रयागराज येथे येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘अक्षयवट’ येथे पूजाअर्चा केली. पंतप्रधानांच्या हस्ते या वेळी प्रयागराज येथे महाकुंभनिमित्ताने तयार करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.
संगम नोज येथे पूजा व अभिषेक केल्यानंतर पंतप्रधानांनी अक्षयवट वृक्षाचे दर्शन घेतले. महाकुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी आणि विश्वकल्याणासाठी मोदींनी प्रार्थना केली आणि अक्षयवट वृक्षाला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर हनुमान मंदिर आणि सरस्वती कूप येथे दर्शन घेतले आणि पूजा केली.
हेही वाचा : राजस्थान, जम्मू-काश्मीरमध्ये थंडीची लाट
पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेणी संगम येथे पूजा केली. येथील आरतीमध्येही ते सहभागी झाले.
संगम नोज येथे पंतप्रधानांनी बोटीतून प्रवास केला आणि विकासकामांचा आढावा घेतला.
पंतप्रधानांनी प्रमुख मंदिर कॉरिडॉरचे उद्घाटन केले, ज्यात भारद्वाज आश्रम कॉरिडॉर,श्रृंगवरपूर धाम कॉरिडॉर, अक्षयवट कॉरिडॉर आणि हनुमान मंदिर कॉरिडॉर यांचा समावेश आहे. महाकुंभमेळा पंतप्रधानांच्या प्रेरणेने भव्य, दिव्य आणि डिजिटल स्वरूपात उत्सवात साजरा करण्यात येईल, असे योगी आदित्यनाथ यांनी या वेळी सांगितले.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन मेहता, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक आणि मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यावेळी उपस्थित होते. प्रयागराज येथे महाकुंभमेळा १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत साजरा केला जाणार आहे.
५५०० कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रयागराजमध्ये ५५०० कोटींच्या १६७ विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या वेळी पंतप्रधानांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि प्रयागराजमध्ये अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी १० नवीन उड्डाणपूल, कायमस्वरूपी घाट आणि नदीसमोरील रस्ते यांसारख्या विविध प्रकल्पांचा समावेश आहे.