नवी दिल्ली : डॉ. आंबेडकरांच्या मूल्यांचे पालन करणाऱ्या राजकीय पक्षाचा मी सदस्य आहे. आम्ही कधीही आंबेडकरांचा अपमान केलेला नाही. उलट, काँग्रेस आंबेडकरविरोधी असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे, असे प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिले. राज्यसभेतील शहांच्या आंबेडकरांसंदर्भातील विधानावरून काँग्रेसने शहा आंबेडकरविरोधी असल्याचा आरोप केला.
काँग्रेसने माझ्या राज्यसभेतील विधानांची तोडमोड केली असून चुकीचा अर्थ काढला आहे. मोदींची भाषणेही संपादित करून काँग्रेसने प्रसारित केली आहेत. प्रसारमाध्यमांनी माझी पूर्ण विधाने दाखवावीत, असे आवाहन शहांनी केले. काँग्रेसने लष्कर, महिलांचा अपमान केला. देशाचा भूभाग दुसऱ्या देशाच्या स्वाधीन केला. काँग्रेसचे हे कारनामे उघड झाल्यामुळे ते सत्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न करत आहे व लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप शहांनी केला.
हेही वाचा : शहांच्या विधानामुळे विरोधकांना हत्यार, पंतप्रधानांसह भाजप नेते गृहमंत्र्यांच्या बचावासाठी मैदानात
काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना भारतरत्न दिले नाही, उलट ते मिळू नये असाच काँग्रेसचा प्रयत्न होता. आंबेडकरांबद्दल नेहरूंच्या मनात द्वेष होता ही बाब जगजाहीर आहे. मोदी सरकारने मात्र आंबेडकरांचा सन्मान केला. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर आंबेडकरांची स्मारके उभारली गेली. २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा होऊ लागला, असे शहा म्हणाले.
‘भाजपचा मनुस्मृतीवर विश्वास’
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बुधवारी पत्रकार परिषदेत मोदींवर शहांचा बचाव केल्याचा आरोप केला. डॉ. आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या मंत्र्याला मोदींनी मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाकायला हवे होते असे ते म्हणाले. तर, गृहमंत्र्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. डॉ. आंबेडकरांचे योगदान व संविधान नष्ट करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
‘शहा यांच्याविरोधात कारवाई करणार का?’
मुंबई : शहा यांनी ‘आंबेडकर आंबेडकर ही फॅशन झाली त्याऐवजी देवाचे नाव घेतले असते तर सात जन्माचे पुण्य लाभल असते’ असा उद्दाम उल्लेख केला. बाबासाहेबांचा असा उल्लेख केल्यावर भाजप शहांवर कारवाई करणार आहे की नाही, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केला.
विधिमंडळात पडसाद
नागपूर : अमित शहा यांच्या वक्तव्याचे पडसाद विधानसभा व विधान परिषदेतही उमटले. विरोधी बाकांवरील सदस्यांनी शहांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि चर्चेची मागणी केली. मात्र, विधानसभा आणि विधान परिषेदत भाजपच्या सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला.
संविधान पवित्र असल्याचे मोदी म्हणतात पण, ते संविधानाचा आदर करत नाहीत. भाजपचे नेते स्वर्ग आणि नरक यांच्याबद्दल बोलतात. ही भाषा तर मनुस्मृतीतील आहे. हाच त्यांचा विचार आहे, संघाचा विचार आहे. त्यांचा संविधानावर विश्वास नाही.
मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस</cite>
खरगेंनी माझ्या राजीनाम्याची मागणी केली असून मी राजीनामा दिल्याने त्यांना आनंद होणार असेल तर माझी राजीनामा देण्याची तयारी आहे. पण, त्यामुळे काँग्रेसचे प्रश्न संपणार नाहीत. त्यांना सत्ता मिळणार नाही.
अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री