अहमदनगरच्या श्रीगोंदा येथे शनिवारी संध्याकाळी काही गोरक्षकांवर तब्बल ५० जणांच्या जमावाने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला झालेल्या गोरक्षकांनी पोलिसांच्या साथीने गुरांची अवैध वाहतूक करणारा एक टेम्पो पकडला होता. यावेळी पोलिसांनी टेम्पोचा मालक वाहिद शेख आणि चालक राजू फत्रुभाई शेख या दोघांना ताब्यातही घेतले. या दोघांवरही महाराष्ट्र पशू संरक्षण कायद्यातंर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, यानंतर पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर गोरक्षकांवर एका जमावाने धारदार शस्त्रे आणि दगडांच्या सहाय्याने हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये सात गोरक्षक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांकडून संबंधितांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील शिवशंकर राजेंद्र स्वामी यांच्यासह काही गोरक्षक श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावात भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या ठिकाणी गेले होते. शिवशंकर स्वामी यांच्या दाव्यानुसार सरकारकडून त्यांची प्राणीमित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत स्वामी यांनी पशूंची अवैध वाहूतक करणाऱ्यांविरोधात ३०० तक्रारी दाखल केल्या आहेत. या कार्यामुळे जीवाला असणारा धोका लक्षात घेता पुण्यात असताना त्यांना १२ तासांसाठी पोलीस संरक्षण पुरवले जाते. याशिवाय, ते अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे सदस्यही आहेत. त्यांच्यासह ११ जणांचे गोरक्षकांचे पथक नेहमीप्रमाणे शनिवारी काष्टी येथील आठवडी बाजाराच्या ठिकाणी गेले होते. या ठिकाणी कत्तलखान्यात नेण्यासाठी गायींची अवैध विक्री आणि वाहतूक असे, यावर नजर ठेवण्यासाठी आपण येथे येत असल्याचा स्वामी यांनी केला. आम्हाला एका टेम्पोतून गुरांची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही श्रीगोंदा पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने दौंड-अहमदनगर मार्गावर हॉटेल तिरंगाच्याजवळ साधारण दुपारी एकच्या सुमारास हा टेम्पो अडवण्यात आला. यावेळी टेम्पोमध्ये १० बैल आणि दोन गायी आढळून आल्या. त्यावेळी आम्ही पोलीस ठाण्यात जाऊन या सगळ्याची रितसर तक्रार दाखल केली. त्यानंतर भूक लागल्यामुळे आम्ही सर्वजण जेवण्यासाठी जवळच्या एका हॉटेलात गेलो. तेव्हा त्या ठिकाणी शस्त्र घेऊन काहीजणांचा जमाव उभा होता. त्यामुळे आम्ही पुन्हा पोलीस ठाण्यात गेलो आणि वाहिद शेख आणि चालक राजू फत्रुभाई शेख यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. हे दोघेजण हमालवाडा येथील कत्तलखान्यात कत्तलीसाठी गुरे नेत असल्याचा आरोप शिवशंकर स्वामी यांनी केला.

शिवशंकर स्वामी साधारण सहाच्या सुमारास तक्रार दाखल करून आपल्या साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या बाहेर पडले. त्यावेळी बाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह मोठा जमाव जमला होता. या जमावाच्या हातात धारदार शस्त्रे आणि दगड होते. आम्ही बाहेर पडल्यानंतर त्यांनी आमच्यावर या जमावाने हल्ला केला. हल्लेखोरांनी कार्यकर्त्यांच्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनही हिसकावल्या. या मारहाणीत आमचे कार्यकर्ते जखमी झाल्याचे स्वामी यांनी सांगितले.