चालत्या बसमध्ये वाहक, त्याचा साथीदार आणि अन्य एक प्रवासी या तिघांनी आई व मुलीचा विनयभंग करून त्यांना गाडीतून ढकलून देण्याचा अमानुष प्रकार पंजाबात उघडकीस आला आहे. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत मुलीचा मृत्यू झाला असून आई जबर जखमी झाली आहे.
विशेष म्हणजे ज्या बसमधून या दोघी मायलेकी प्रवास करत होत्या ती बस पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या वाहतूक कंपनीची आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळणही लागले आहे.
मोगा-कोटकपुरा या मार्गावरील गिल या गावानजीक एका चालत्या बसमधून मायलेकींना ढकलण्यात आले. यात सोळा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला तर आई जबर जखमी झाली आहे.
संबंधित महिलेने दिलेल्या जबानीनुसार मुलगी व दहा वर्षांचा मुलगा यांच्यासह ती मोगा येथून भागपुराना येथे जात होती. गाडीत कोणीही नव्हते. वाहक, त्याचा साथीदार व आणखी एक प्रवासी यांनी आपल्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्यांनी विनयभंग केला. तिघा नराधमांना रोखण्यासाठी मुलगी पुढे आली असता तिचाही या तिघांनी विनयभंग केला. त्यानंतर आम्हा दोघींनाही या तिघांनी चालत्या गाडीतून फेकून दिले. महिलेच्या जबानीवरून पोलिसांनी वाहक व त्याचा साथीदार यांना अटक केली असून तिसरा गुन्हेगार फरार आहे.
दरम्यान, संबंधित बस मुख्यमंत्री बादल यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या वाहतूक कंपनीची असल्याने विरोधकांनी बादल यांनाच लक्ष्य केले आहे. संसदेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले. काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या खासदारांनी बादल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. माझ्या कुटुंबीयांच्या मालकीची वाहतूक कंपनी असली तरी माझा तिच्याशी काहीही संबंध नाही. या घटनेची चौकशी होईल आणि दोषींना कठोर शिक्षा होईलच.
– प्रकाशसिंग बादल, पंजाबचे मुख्यमंत्री