डिसेंबर महिना उजाडला की, अनेकांना ३१ डिसेंबरचे वेध लागतात. नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी अनेक जण पार्टी, पिकनिकांचे बेत आखतात. प्रत्येकजण आपली ऐपत आणि सोयीनुसार ३१ डिसेंबरचा प्लान करतो. भारतातील अतिश्रीमंत वर्गात मोडणारे काहीजण तर ३१ डिसेंबरच्या एकारात्रीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करायला तयार असतात.

अनेक नामांकित पंचतारांकीत हॉटेल्स, रिसॉटर्स ३१ डिसेंबरसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारतात. यंदा राजस्थानमधील हॉटेल्सचे दर पाहून सर्वसामान्यांचे डोळे विस्फारतील. जोधपूरच्या उमेद भवन पॅलेस आणि उदयपूरच्या ताज लेक पॅलेस या हॉटेलमध्ये ३१ डिसेंबरच्या एका रात्रीच्या वास्तव्यासाठी तब्बल ११ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

हॉटेलमधील अन्य खोल्यांच्या तुलनेत खास सूटसचे दर नेहमीच जास्त असतात. ३१ डिसेंबरच्या रात्रीसाठी तर अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये हॉटेलच्या भाडयामध्ये ४० टक्के वाढ झाली आहे असे जयपूरच्या रामबाग पॅलेसच्या सूत्रांनी सांगितले. हॉटेल पूर्ण भरलेले नसेल तर २० टक्क्यापर्यंत सवलत मिळते पण नववर्षाच्यावेळी ही सवलत फार कमी असते तसेच भाडे कमी करुन द्यायलाही कोणी तयार नसते.

जयपूरच्या रामबाग पॅलेसमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री काही खास सूटससाठी ८.५२ लाख रुपये भाडे आकारले जाते. यामध्ये कराचा समावेश नाही. २०१७ वर्षअखेरीच्या तुलनेत त्यात ७ टक्के वाढ झाली आहे. अन्य हॉटेल्समध्ये हेच दर कमी-जास्त प्रमाणात सारखेच असतात. हॉटेलमधील सूटसचा सरासरी दर २५ ते ७० हजारच्या दरम्यान आहे.

 

Story img Loader