राजस्थान विधानसभा निवडणुकीत महिला व युवकांना उमेदवारीसाठी प्राधान्य देण्याची सूचना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील नेत्यांना केली आहे. विधानसभेसोबतच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असेही आदेश राहुल गांधी यांनी राज्यातील नेत्यांना दिले. राजस्थान प्रभारी व माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत व राज्यातील नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज, सोमवारी झाली.
येत्या ३१ ऑक्टोबर रोजी उमेदवारांची पहिली यादी घोषीत केली जाईल, असा विश्वास गुरुदास कामत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर राहुल गांधी नाराज असले तरी ओबीसी समीकरणे पाहता गेहलोत यांना राज्यात पर्याय नाही. यासंबंधी राहुल यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली केली. राजस्थानातील बहुसंख्य गूज्जर समुदाय पाहता गूज्जर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता, पक्षसूत्रांनी व्यक्त केली.