जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने पाठिंबा काढल्यामुळे मेहबूबा मुफ्ती सरकार कोसळल्यानंतर आता रमजानच्या पवित्र महिन्यात काश्मीर खोऱ्यात झालेल्या हिंसाचाराची आकडेवारी समोर आली आहे. रमजानच्या महिन्यात केंद्र सरकारने काश्मीरमध्ये शस्त्रसंधी जाहीर करुन दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई थांबवली होती. काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी हा त्यामागे सरकारचा उद्देश होता. पण ही शस्त्रसंधी एकतर्फीच ठरल्याचे दिसत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार रमजानच्या महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये २६५ टक्के वाढ झाली. सुरक्षा दलाच्या जवानांची हत्या करण्याचे प्रमाण ८० टक्क्यांनी वाढले. फक्त दगडफेकीच्या घटना ४० टक्क्यांनी कमी झाल्या आणि दहशतवादी हल्ल्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले. १६ मे पासून काश्मीरमध्ये शस्त्रसंधी जाहीर झाली होती.
अधिकृत आकडेवारीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये १५ एप्रिल ते १६ मे दरम्यान दहशतवादाशी संबंधित २० घटना घडल्या. तेच मे १७ ते १६ जून दरम्यान दहशतवादाच्या ७३ घटना घडल्या. शस्त्रसंधीच्या कालावधीत २२ दहशतवादी मारले गेले. त्याआधीच्या महिन्यात १४ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. जे दहशतवादी ठार झाले ते बहुतांश परदेशी होते.
शस्त्रसंधीच्या आधीच्या महिन्यात दहशतवादी घटनांमध्ये पाच सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला होता. तोच शस्त्रसंधीच्या काळात नऊ जवानांचा मृत्यू झाला. कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी संभाळताना १४ सुरक्षा जवान जखमी झाले तर दहशतवादी हल्ल्यांमध्ये ५२ जवान जखमी झाले. शस्त्रसंधीच्या महिन्यात पाच नागरिकांचा मृत्यू झाला त्याआधीच्या महिन्यात १२ नागरिकांचा मृत्यू झाला होता. काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना सातत्याने घडत असतात. शस्त्रसंधी असताना दगडफेकीच्या १०७ तर १५ एप्रिल ते १६ मे दरम्यान २५८ घटना घडल्या.