बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी राज्यातील ६ नक्षलग्रस्त जिल्ह्य़ांमधील ३२ मतदारसंघांत सरासरी ५५ टक्के मतदान झाले. औरंगाबाद जिल्ह्य़ात मतदान केंद्राजवळ एक बॉम्ब सापडल्याची घटना वगळता मतदानाला गालबोट लागले नाही.
कैमूर, रोहतास, अरवाल, जेहानाबाद, औरंगाबाद आणि गया या जिल्ह्य़ांमधील ३२ मतदारसंघांमध्ये ३२ महिलांसह ४५६ उमेदवारांनी आपले नशीब अजमावले. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी ९११९ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती.
सर्वाधिक, म्हणजे ५५.१६ टक्के मतदान गया मतदारसंघात, तर सगळ्यात कमी ४८.३९ टक्के मतदान औरंगाबाद मतदारसंघात झाल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मोठय़ा संख्येत उत्साहाने मतदानाला आलेले महिला आणि वयोवृद्ध यांच्या रांगा सर्वच मतदारसंघांतील मतदार केंद्रांवर दिसून आल्या.
अतिसंवेदनशील अशा नक्षलग्रस्त भागात असलेल्या ११ मतदारसंघांत दुपारी ३ वाजता, तर १२ ठिकाणी दुपारी ४ वाजता मतदान संपले. केवळ ९ मतदारसंघांतच सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान झाले.
नक्षलग्रस्त जिल्ह्य़ातील मतदारसंघांमध्ये शांततेने मतदान व्हावे, यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांसमोर सुरक्षेचे मोठे आव्हान होते. मतदान होणाऱ्या जिल्ह्य़ांत केंद्रीय निमलष्करी दलाच्या ९९३ कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील रफीगंज विधानसभा मतदारसंघात कसमा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बालार खेटय़ातील एका मतदान केंद्रानजीक सुरक्षा दलाला ‘केन बॉम्ब’ आढळला. तो लगेच निकामी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
रफीगंज व इमामगंज मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर एक मध्यमवयीन मतदार व सीआरपीएफचा एक कर्मचारी हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावले.
दरम्यान, इमामगंज मतदारसंघात जद(यू)चे उमेदवार आणि विधानसभा अध्यक्ष उदयनारायण चौधरी यांना लढत देणारे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी अनुसूचित जातीच्या अनेक मतदारांची नावे मतदारसंघातून वगळण्यात आल्याची तक्रार
केली.