पंतप्रधान मनमोहन सिंग येत्या २० सप्टेंबरपासून सहा दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून या वेळी ते अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी विविध महत्त्वांच्या विषयांवर चर्चा करणार आहेत. या दौऱ्याच्या सुरुवातीला ते न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार आहेत.
अमेरिकेच्या उपाध्यक्ष जोसेफ बिडेन सध्या भारताच्या दौऱ्यावर असून मंगळवारी नवी दिल्लीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी झालेल्या बैठकीत नागरी अणू करार, वाणिज्य आदी विषयांवर चर्चा झाली. नागरी अणू कराराला प्रोत्साहन देण्यासोबत व्यापारवृद्धीला चालना देण्याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चेदरम्यान जोर दिला. या बैठकीदरम्यानच पंतप्रधानांनी सप्टेंबरमध्ये अध्यक्ष ओबामा यांना भेटणार असल्याचे बिडेन यांना सांगितले.
अध्यक्ष ओबामा यांच्या कार्यकालात पंतप्रधान मनमोहन सिंग दुसऱ्यांदा वॉशिंग्टन दौऱ्यावर जाणार आहेत. नोव्हेंबर २००९ मध्ये द्विपक्षीय चर्चेसाठी पंतप्रधान वॉशिंग्टनला गेले होते.  एप्रिल २०१० मध्येही पंतप्रधान वॉशिंग्टनला गेले होते. मात्र त्या वेळी अणू सुरक्षा परिषदेला उपस्थित राहण्यासाठी गेले होते.
दरम्यान, अमेरिकेचे उपाध्यक्ष बिडेन आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चर्चेदरम्यान प्रादेशिक तसेच जागतिक मुद्दय़ांवर चर्चा केली. यामध्ये अफगाणिस्तानमधील सद्यस्थितीबाबतही चर्चा केली. पुढील वर्षी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील फौजा अफगाणिस्तानातून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे भारताच्या दृष्टीनेही या वेळी चर्चा करण्यात आली.

Story img Loader