पीटीआय, गंगटोक
सिक्कीमला उद्धवस्त करणाऱ्या तिस्ता नदीच्या आकस्मिक पुराचा चिखल आणि ढिगारे यांतून आतापर्यंत नऊ लष्करी जवानांसह ३२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याच वेळी, अद्यापही बेपत्ता असलेल्या शंभरहून अधिक जणांचा शोध सुरूच आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.
बुधवारी पहाटे ढगफुटीमुळे आलेल्या आकस्मक पुराचा ४१,८७० लोकांना फटका बसला आहे. आतापर्यंत देशाच्या इतर भागांशी संपर्क तुटलेल्या राज्याच्या निरनिराळय़ा भागांतून २५६३ लोकांची सुटका करण्यात आली आहे, असे सिक्कीम राज्य आपदा व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले.अद्याप बेपत्ता असलेल्या १२२ लोकांचा शोध सुरू आहे. पाक्याँग जिल्ह्यातील ७२, गंगटोक जिल्ह्यातील २३, मंगन जिल्ह्यातील १५ आणि नामची येथील सहा लोक बेपत्ता आहेत. शोधमोहिमेसाठी विशेष प्रकारचे रडार, ड्रोन आणि लष्कराचे श्वान तैनात करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>मित्राला २००० रुपये ट्रान्सफर केले अन् स्वत:च्या बँक खात्यात आढळले ७५३ कोटी, नेमकं काय घडलं?
सिक्कीमची जीवनवाहिनी असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दहाच्या पृष्ठभागाचे आणि तिस्ता नदीवरील अनेक पुलांचे नुकसान झाल्यामुळे हा महामार्ग वापरयोग्य राहिलेला नाही. रांगपो आणि सिंगताम दरम्यानचा रस्ता सुरू करण्याचे व त्याचे रुंदीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.राज्याची राजधानी गंगटोकला जाणारे पर्यायी मार्ग पूर्व सिक्कीम जिल्ह्याच्या मार्गाने खुले आहेत. मात्र, उत्तर सिक्कीममध्ये मंगनच्या पलीकडील रस्त्यांचा संपर्क तुटलेला आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.