सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी केलेले आरोप खासदार शशी थरुर यांनी फेटाळून लावले आहेत. आपल्यावर करण्यात आलेले आरोप हास्यास्पद असून आपण त्याविरोधात कायदेशीर लढाई लढू असे थरुर यांनी म्हटले आहे. सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरणात सोमवारी दिल्ली पोलिसांनी कोर्टात तीन हजार पानी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात सुनंदा यांचे पती आणि खासदार शशी थरुर यांना आरोपी बनवण्यात आले आहे.

शशी थरुर यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. माझ्या चिथावणीवरुन सुनंदा आत्महत्या करेल यावर सुनंदाला ओळखणाऱ्यांपैकी कोणीही विश्वास ठेवणार नाही असे थरुर यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. दिल्ली पोलिसांच्या तपास करण्याच्या पद्धतीवर आणि हेतूबद्दलही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. चार वर्षांच्या तपासानंतर दिल्ली पोलीस या निष्कर्षापर्यंत पोहोचल्याने त्यांच्या हेतूबद्दल प्रश्न निर्माण होतो.

या प्रकरणात कायदा अधिकाऱ्याने १७ ऑक्टोंबरला दिल्ली हायकोर्टात कोणाही विरोधात काहीही सापडले नसल्याचे सांगितले होते आणि आता सहा महिन्यांनी माझ्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे हे अविश्वसनीय आहे असे थरुर यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

या प्रकरणात हत्येच्या कलम ३०२ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. १७ जानेवारी २०१४ रोजी दक्षिण दिल्लीतील हॉटेल लीलीमधील रुम नंबर ३४५ मध्ये सुनंदा पुष्कर मृतावस्थेत आढळल्या होत्या. घटनेच्याच रात्री तपासासाठी या रुमला टाळे ठोकण्यात आले होते.

१ जानेवारी २०१५ रोजी अज्ञात व्यक्तिविरोधात हत्येच्या कलमाखाली एफआयआर नोंदवण्यात आला. पतियाळा हाऊस कोर्टात यावर २४ मे रोजी सुनावणी होणार आहे. शशी थरुर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात राज्यमंत्री होते. केरळची राजधानी तिरुअनंतपूरम येथून ते खासदार आहेत. सुरुवातीपासून सुनंदा यांच्या मृत्यूबद्दल संशय होता. एम्स रुग्णालयाने अनैसर्गिक मृत्यू असल्याचे स्पष्ट केले होते.

 

Story img Loader