वृत्तसंस्था, चेन्नई / तिरुवनंतपुरम / हैदराबाद :

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘उत्तर भारतीयांचा पक्ष’ हा शिक्का पुसून टाकण्याचा भाजपचा प्रयत्न या निवडणुकीतही यशस्वी होऊ शकलेला नाही. तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांची जादू चालेल आणि किमान ४-५ जागा मिळतील, अशी भाजपची अपेक्षा होती. मात्र प्रादेशिक पक्षांचा कायम वरचष्मा राहिलेल्या या राज्यात त्याला यावेळीही भोपळा फोडता आला नाही. केरळमध्ये त्रिचूर मतदारसंघात विजय मिळवून भाजपने राज्यातील ‘दुष्काळ’ संपुष्टात आणला.

तमिळनाडूमध्ये राज्यातील सत्ताधारी द्रमुक आणि मित्रपक्ष असलेले काँग्रेस, व्हीसीके, मुस्लीम लीग, भाकप आणि माकप यांनी ३९पैकी तब्बल ३४ जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. कनिमोळी, टी. आर. बालू, दयानिधी मारन हे तारांकित उमेदवार विजयी झाले आहेत. केरळमध्ये काँग्रेसप्रणीत यूडीएफ आघाडीने मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. राज्यात काँग्रेसने सर्वाधिक १३ जागा जिंकल्या. वायनाडमध्ये राहुल गांधी यांनी विजयाची पुनरावृत्ती केली आहे. त्रिचूरमध्ये अभिनेते सुरेश गोपी यांच्या रूपात भाजपला लोकसभेमध्ये राज्यातील पहिला विजय मिळाला आहे. तिरुवनंतपुरममध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी जोरदार लढत दिली. थरूर यांचा अवघ्या १६ हजार ७७ मतांनी विजय झाला. आंध्र प्रदेशात भाजपला तीन आणि मित्रपक्ष तेलगू देसमला १६ जागांवर विजय मिळाला. तेलंगणात भाजप आणि काँग्रेसला समसमान ८ जागा जिंकता आल्या. चेन्नईमध्ये विजयी झालेल्या द्रमुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला़.

हेही वाचा >>>गुजरातमध्ये दहा वर्षांनंतर काँग्रेसचे खाते

स्टॅलिन यांना बळ

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे नेतृत्व लोकसभा निकालाने अधिक उजळून निघाले. कोयंबतूरमध्ये राहुल गांधींबरोबर घेतलेल्या एका सभेने अण्णामलाई यांची निश्चित जागा खेचून आणण्यात त्यांना यश आले. संपूर्ण प्रचारकाळात ‘इंडिया’ आघाडीच्या यशाची स्टॅलिन सातत्याने खात्री देत होते. त्यांचे सर्व दावे खरे ठरले आहेत.

मतटक्का दिलासादायक

तमिळनाडूमध्ये एकही जागा जिंकणे भाजपला शक्य झाले नसले, तरी मतांच्या टक्केवारीने मात्र काहीसा दिलासा दिला आहे. द्रमुक आणि अण्णा द्रमुकच्या खालोखाल मते भाजपला मिळाली असून प्रथमच १०.७७ टक्के मते मिळाली आहेत. तर केरळच्या मतटक्क्यातही भाजपने समाधानकारक कामगिरी केली आहे. माकपखालोखाल (२५.८२ टक्के) भाजपला १६.६८ टक्के मते आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In tamil nadu the ruling party in the state won 34 seats out of 39 undisputed dominance amy
Show comments