दोन महिन्यांपूर्वी वस्त्रोद्योग मंत्रालयाचा पदभार घेतलेल्या स्मृती इराणी यांच्याबाबत नव्या वादाला तोंड फुटले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव रश्मी वर्मा यांच्याबरोबर झालेल्या मतभेदामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. दोघांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी अखेर पंतप्रधान कार्यालयाला हस्तक्षेप करावा लागल्याचे बोलले जात आहे. आपल्याकडे येणारया सर्व फाईल्स या प्रथम रश्मी वर्मा यांच्याकडे जात असल्यामुळे स्मृती इराणी नाराज असल्याचे सांगितले जाते.
स्मृती इराणी यांनी मागील दोन दिवसात वस्त्रोद्योग मंत्रालयाशी संबंधित सुमारे दोन डझनहून अधिक टिपणे वर्मा यांना पाठवून त्याची उत्तरे त्वरीत देण्यास सांगितले आहे. ऑक्टोबर महिन्यात होणारया टेक्सटाईल परिषद व वस्त्रोद्योगासाठी सहा हजार कोटी रूपयांचे पॅकेज केंद्राच्या वतीने देण्यात येणार आहे. यासह विविध विषयांवर इराणी व वर्मा यांच्यामध्ये मतभेद असल्याचे सूत्रांनी सांगितले. वस्त्रोद्योग मंत्रालयातील इतर अधिकारयांसमोर ही दोघांत वाद झाल्याचे सांगितले जाते. परंतु इराणी व वर्मा यांनी आपल्यात कसलेच मतभेद नसल्याचे सांगितले आहे.

रश्मी वर्मा या १९८२ च्या बिहार केडरच्या आयएएस अधिकारी असून कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांच्या त्या बहीण आहेत. डिसेंबर २०१५ मध्ये त्यांची वस्त्रोद्योग मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली होती. तर जुलै महिन्यात झालेल्या कॅबिनेट फेरबदलात स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून ते प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपवण्यात आले होते. मनुष्यबळ विकास मंत्री असतानाही स्मृती इराणी या आपल्या वक्तव्यामुळे व कार्यशैलीमुळे अनेकवेळा अडचणीत आल्या होत्या. स्मृती इराणी सातत्याने विविध कारणांमुळे चर्चेत असतात.