पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामुळे भारत १५ वर्ष मागे गेला आहे. जर मोदी यांना पुन्हा एकदा सत्ता दिल्यास भारत ५० वर्ष मागे जाईल. मोदी पंतप्रधान नव्हे तर एखाद्या राजासारखा वागत आहेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाला वाचवायला हवे असे डीएमके अध्यक्ष एमके स्टॅलिन म्हणाले. यावेळी स्टॅलिन यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या कारभारावर टीका केली. तर पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी योग्य उमेदवार असल्याचेही सांगितले. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राहुल गांधी यांना डीएमके अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी पाठिंबा दिला आहे.

 राहुल गांधीआणि सोनिया गांधी तामिळानाडू दौऱ्यावर आहेत. यावेळी दिवंगत मुख्यमंत्री आणि डीएमके नेते एम. करुणानिधी यांच्या पुतळ्याचे यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सोनिया-राहुल यांनी चेन्नईतील व्हायएमसीए मैदानात जनसभेला संबोधित केले. डीएमके अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे स्वागत केले. तसेच तामिळनाडूतील जनतेच्या मनात राहुल गांधी आगामी निवडणुकीत पंतप्रधान असावेत असे आहे, असे ते म्हणाले.

 नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्याची क्षमता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींमध्ये आहे. यूपीएकडून राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील.  मला आशा आहे की राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील, असे स्टॅलिन म्हणाले.