मुंबई : डॉ. माणिक साहा यांची त्रिपूराच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आल्याने ईशान्येकडील राज्यात भाजपचे चौथे मुख्यमंत्री हे मुळचे काँग्रेस पक्षाचे असतील.

आसामचे हेमंत बिश्व सरमा, अरुणाचल प्रदेशचे प्रेम खांडू, मणिपूरचे एन. बिरेन सिंह हे ईशान्येतील तीन राज्यांचे मुख्यमंत्री जुने काँग्रेसचे नेते आहेत. या तिघांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्रिपूरा भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झालेले डॉ. माणिक साहा हे मूळचे काँग्रेसचे. २०१६ मध्ये डॉ.साहा यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. डॉ. साहा यांच्या नियुक्तीमुळे ईशान्येकडील राज्यात मूळचे काँग्रेसी चौथे भाजपचे मुख्यमंत्री म्हणून विराजामान होत आहेत.

दरम्यान पुढील वर्षी त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर त्रिपुरातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “त्रिपुरामध्ये भाजपाला दीर्घकाळ सत्तेत ठेवण्याची गरज आहे.” त्यामुळे मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, “पक्ष हा सर्वात वर आहे. मी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पक्षासाठी काम केलं. मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्रिपुरातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मी शांतता, विकास आणि राज्याला कोविड संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.”

बिप्लब कुमार देब यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर एकाच दिवसात त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Story img Loader