भारतात लवकरच जगातलं सर्वात मोठं संग्रहालय युगे युगे भारत हे बांधलं जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मागच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘भारत मंडपम’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कनव्हेन्शन सेंटरचं उद्घाटन केलं त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली.
सध्याच्या घडीला लंडनमध्ये असलेलं ब्रिटिश म्युझियम आणि पॅरीसमध्ये असलेलं ग्रँड लूव्हर हे संग्रहालय ही दोन संग्रहालयं जगातल्या सर्वात मोठ्या संग्रहालयांमध्ये गणली जातात. या दोहोंचं क्षेत्रफळ ७० हजार स्क्वेअर मीटर इतकं आहे. या दोन्ही संग्रहालयांमध्ये लाखो वस्तू आहेत. मात्र भारतात फ्रान्सच्या मदतीने उभारलं जाणारं युगे युगे भारत हे राष्ट्रीय संग्रहालय हे १.१७ लाख स्क्वेअर मीटर इतक्या भागात व्यापलेलं असणार आहे अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली.
जगातलं सर्वात मोठं संग्रहालय भारतात उभारलं जाईल असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्याच आठवड्यात केलं. फ्रान्सच्या सहकार्याने हे संग्रहालय बांधलं जाणार आहे. भारताची संपूर्ण संस्कृती या संग्रहालयात पाहता येणार आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं. हे संग्रहालय आठ वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये विभागलेलं असणार आहे. भारतीय संस्कृतीच्या ५ हजार वर्षांची कथा हे संग्रहालय सांगणार आहे. भारतातल्या ऐतिहासिक घटना, व्यक्ती आणि त्यांची कामगिरी हे दर्शवणारं हे संग्रहालय असणार आहे असंही काही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
भारतातलं हे भव्य संग्रहालय २०२६ पर्यंत उभारलं जाईल असं सूत्रांनी सांगितलं असलं तरीही हे भव्य दिव्य संग्रहालय नेमकं कधीपर्यंत बांधून होणार आहे याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. ज्या जागेवर हे संग्रहालय उभारलं जाणार आहे त्या नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक या ठिकाणी कार्यालयीन इमारती आहेत. या संपूर्ण जागा पर्यटकांनी, अभ्यासकांनी भेट देण्याच्या दर्जाच्या बनवण्यासाठी काही विशिष्ट कालावधी लागू शकतो असंही सांगण्यात येतं आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने थीम आणि इतर गोष्टींवर त्यांचं काम पूर्ण केल्यानंतर या संग्रहालयाच्या डिझाईनला अंतिम रुप दिलं जाईल अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक या ठिकाणी असलेली कार्यालयं सेंट्रल व्हिस्टा या ठिकाणी नेण्यात आल्यानंतर काम सुरु होईल असंही सांगण्यात येतं आहे.
फ्रान्स या मोठ्या प्रकल्पासाठी भारताची साथ करणार आहे. विविध कलाकृती कशा असाव्यात? त्या संग्रहालयात कुठे ठेवण्यात याव्यात इत्यादी बारकाव्यांसाठीही फ्रान्स काम करणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार परस्पर संवाद वाढवणं हे या नव्या संग्रहालयाचं वैशिष्ट्य असणार आहे. तसंच हे संग्रहालय फिरत असताना दृकश्राव्य घटकही असणार आहेत. त्यातून माहिती दिली जाणार आहे.