मद्य तस्करी आणि हत्येच्या वेगवेगळया प्रकरणात मृत्यू दंडाची शिक्षा झालेल्या १५ भारतीयांना दुबईस्थित हॉटेलियर आणि समाजसेवक एस.पी. सिंग ओबेरॉय यांनी फाशीच्या शिक्षेपासून वाचवले. यात १४ पंजाबी आणि एक बिहारी युवक आहे. चौदा जण त्यांच्या कुटुंबाकडे परतले असून एकाच्या कागदपत्रांची पूर्तता बाकी असल्याने तो पुढच्या काही दिवसात मायदेशी परतेल.

एस.पी.सिंग ओबेरॉय यांनी या सर्व युवकांना प्रसारमाध्यमांसमोर आणले. यूएईला जाणाऱ्या पंजाबी युवकांनी आपण मद्यतस्करीच्या जाळयात अडकणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मद्यतस्करीवरुन अनेकदा दोन गटांमध्ये हाणामारी होते. त्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर तिथल्या कठोर कायद्यानुसार फाशीची शिक्षा सुनावली जाते असे ओबेरॉय यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील आझमगड येथे राहणाऱ्या विरेंद्र चौहानची नोव्हेंबर २०११ मध्ये दुबईमध्ये हत्या झाली होती. त्या प्रकरणी पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर अन्य दहा जणांना अबू धाबीमधील मोहम्मद फरहान या पाकिस्तानी नागरिकाची हत्या केल्या प्रकरणी फाशीची शिक्षा झाली होती.

ओबेरॉय यांनी हत्या झालेल्या दोन्ही मृतांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा करुन ब्लड मनी म्हणजे नुकसान भरपाई स्विकारण्यासाठी राजी केले. यूएईच्या कायद्यानुसार असे करता येते. सरबत दा भाला ट्रस्टच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबांना घसघशीत नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली. यूएईच्या न्यायालयाने तडजोडीचा हा फॉर्म्युला मान्य केल्यानंतर सर्व तरुणांची सुटका झाली.

Story img Loader