उत्तर प्रदेशातील भाजपाचे नेते तहसीन शाहिद यांचा मुलगा हैदरचा एका पाकिस्तानी मुलीशी ऑनलाईन पद्धतीने विवाह पार पडला आहे. या विवाह सोहळ्याला भाजपा नेत्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित असल्याचे बघायला मिळालं. मुलीला व्हिसा मिळण्यास विलंब होत असल्याने तसेच मुलीच्या आईची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी ऑनलाईन पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
मुलीला व्हिसा मिळण्यास बराच विलंब
‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, जौनपूरयेथील भाजपाचे नेचे तहसीन शाहिद यांनी जवळपास एक वर्षापूर्वी त्यांचा मोठा मुलगा हैदरचा विवाह पाकिस्तानच्या लाहौर येथील अंदलीप झाहर या मुलीशी निश्चित केला होता. त्यानंतर अंदलीप झाहराने भारतीय उच्चायुक्तांकडे व्हिसासाठी अर्ज केला होता. मात्र, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे मुलीला व्हिसा मिळण्यास बराच विलंब झाला. अशातच काही दिवसांपूर्वी अचानक अंदलीप झाहराच्या आईची प्रकृती बिघडली. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.
ऑनलाईन पद्धतीने पार पडला विवाह
अशा परिस्थितीत भारतात येणं शक्य नसल्याने दोघांनी ऑनलाईन पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी रात्री तहसीन शाहिद लग्नाच्या शेकडो पाहुण्यांसह इमामबारा कल्लू मरहूम येथे पोहोचले. यावेळी टीव्ही स्क्रीनवर सर्वांसमोर ऑनलाइन विवाह सोहळा पार पडला. दोन्ही बाजुंच्या काझींनी हे लग्न लावून दिले.
शिया धर्मगुरू मौलाना महफूजू एल हसन खान म्हणाले…
यासंदर्भात बोलताना शिया धर्मगुरू मौलाना महफूजू एल हसन खान म्हणाले, इस्लाम धर्मात लग्नासाठी मुलीची परवानगी आवश्यक आहे. मुलीने ही परवानगी दिली, तर दोन्ही पक्षातील मौलाना त्या-त्या ठिकाणी विवाह करून देऊ शकतात. दोन्ही देशांमधील बिघडलेल्या राजकीय संबंधांमुळे दोन्ही बाजूंच्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत दोन्ही देशांच्या राज्यकर्त्यांची इच्छा असेल तर ही समस्या चर्चेतून सोडवता येईल.
हेही वाचा – ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणाऱ्या आरोपीला न्यायालयाची अजब शिक्षा; “महिन्यातून दोनदा २१ वेळा…!”
विवाह सोहळ्याला भाजपा नेतेही उपस्थित
दरम्यान, या विवाह सोहळ्याला भाजपाचे आमदार ब्रिजेश सिंग प्रिशू यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. तसेच पाकिस्तानमध्येही शेकडो नागरिक या विवाहचे साक्षीदार झाले. या विवाह सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना, आपल्या पत्नीला लवकरच व्हिसा मिळेल आणि ती भारतात येईल, असा विश्वास हैदरने व्यक्त केला.