हॉटेलमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याबरोबर आक्षेपार्ह अवस्थेत आढळलेल्या पोलीस उप-अधिकक्षकाला थेट शिपाई पदावर पदावनत करण्यात आलं आहे. कृपा शंकर कनौजिया असं या पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे. तीन वर्षांपूर्वी ते एका महिला पोलीस कर्मचाऱ्याबरोबर कानपूरमधील एका हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले होते.

हेही वाचा – प्रज्ज्वल रेवण्णाच्या भावालाही लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक; आमदार सुरज रेवण्णावर तरुणाचे गंभीर आरोप

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, २०२१ साली कृपा शंकर कनौजिया हे उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये सर्कल ऑफिसर म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी घरी जाण्यासाठी वरिष्ठांकडे सुट्टीचा अर्ज दिला होता. वरिष्ठांनी त्यांची सुट्टीदेखील मंजूर केली. मात्र, ते उन्नावमधून थेट घरी न जाता कानपूरमधील एका हॉटेलमध्ये पोहोचले.

हॉटेलमध्ये पोहोचताच त्यांनी त्यांचा खासगी आणि सरकारी फोन बंद करून ठेवला होता. यादरम्यान, त्यांच्या पत्नींनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नीने यांची माहिती उन्नावच्या पोलीस अधिक्षकांना दिली.

उन्नाव पोलिसांनी जेव्हा कृपा शंकर कनौजिया यांना शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन कानपूरमधील एका हॉटेलमध्ये दिसून आले. त्यानंतर उन्नाव पोलिसांनी थेट संबंधित हॉटेलमध्ये जाऊन तपासणी केली, त्यावेळी कृपा शंकर कनौजिया हे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याबरोबर आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले.

हेही वाचा – ‘उशिरा येऊन, लवकर घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचा दणका’, १५ मिनिटं उशीर झाला तरी…

या घटनेनंतर उन्नाव पोलिसांनी याप्रकरणाचा सविस्तर अहवाल उत्तर प्रदेश सरकारकडे सादर केला होता. त्यानंतर सरकारने तीन वर्षांनंतर त्यांना पोलीस उप-अधिक्षक पदावरून पोलीस शिपाई पदावर पदानवत करण्याची शिफारस केली. सरकारच्या या शिफारशीनंतर आता अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत.