उत्तर प्रदेशच्या अलिगढ जिल्ह्यात पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली दोन जणांना अटक केली आहे. पीडितेने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्यात. या दोघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

अलिगढ जिल्ह्यातील दादोन (Dadon) परिसरात ही घटना घडली. “गावाच्या पंचायतीने आरोपींवर कठोर कारवाई केली नाही, त्यानंतर पीडितेने आत्महत्या केली”, अशी माहिती अलिगढचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मुनीराज यांनी दिली. “घटनेनंतर गावात पंचायत बोलावण्यात आली होती. पण, पंचायतीने केवळ आरोपींच्या कानशिलात लगावली आणि त्यांना सोडून दिलं”, अशी माहिती आत्महत्या केलेल्या पीडितेच्या बहिणीने दिल्याचं मुनिराज यांनी सांगितलं. “पंचायतीने आरोपींची सुटका केल्यानंतर पीडिता घरी गेली आणि आत्महत्या केली”, अशी माहिती तिच्या बहिणीने दिल्याचंही पोलिसांनी नमूद केलं.

‘याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून दोघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलाय. घटनेची चौकशी सुरू असून पंचायतीमध्ये सहभागी झालेल्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल’, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

Story img Loader