आपल्या कार्यालयात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा फोटो लावणाऱ्या विद्युत विभागातील अभियंत्यावर उत्तर प्रदेश सरकारने कारवाई केली असून त्याला सेवेतून बडतर्फ केले आहे. यूपीपीसीएलचे अध्यक्ष एम देवराज यांनी यासंदर्भात माहिती दिली. जून २०२२ मध्ये उत्तर प्रदेशच्या विद्युत विभागातील एसडीओ रवींद्र गौतम यांनी दहशतवादी ओसामा बिन लादेनला जगातील सर्वोत्तम अभियंता म्हणत त्याचा फोटो आपल्या कार्यालयात लावला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने रवींद्र गौतम यांना निलंबित करत चौकशी सुरू होती.
हेही वाचा – Earthquake : अफगाणिस्तान-पाकिस्तानसह उत्तर भारतात भूकंपाचा धक्का; नऊ जणांचा मृत्यू, १०० पेक्षा जास्त जखमी
यासंदर्भात बोलताना यूपीपीसीएलचे अध्यक्ष एम देवराज म्हणाले, ओसामा बिन लादेन हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी होता. त्याचा उल्लेख सर्वोत्तम अभियंता असा करत गौतम यांनी त्याचा फोटो आपल्या कार्यालयात लावला. त्यांच्या या कृतीमुळे विद्युत विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. गौतम यांनी लादेन ऐवजी महापुरुषांचे फोटो कार्यालयात लावायला हवे होते.
हेही वाचा – अमृतपालला अटक करण्यात अपयश का? उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारले
पुढे बोलताना, गौतम यांनी उच्च अधिकार्यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोपही देवराज यांनी केला. रवींद्र गौतम यांनी त्यांच्या कार्यालयात लादेनचा फोटो लावल्यानंतर आम्हाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना निलंबित करत त्यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्यात आली होती. यादरम्यान झालेल्या पत्रव्यवहारात त्यांनी उच्च अधिकार्यांच्या विरोधात अपमानास्पद भाषेचा वापर केला. त्यामुळे त्यांनी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.