राज्यात महत्त्वपूर्ण घडामोडी घडत असताना महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आज दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव के.सी.वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकांसदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती नाना पटोले यांनी बैठकीनंतर दिली.

महाराष्ट्रात काँग्रेस एकसंघ

“काँग्रेस एकसंघ आहे. महाराष्ट्रात काँग्रेस फुटणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष काँग्रेस असेल. काँग्रेसची सध्या लाट आहे. आज लोकांनी ते मान्य केलं आहे, त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेलच”, असं नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा >> मंत्रिमंडळ विस्तारावरून उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “तिन्ही नेते…”

लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू

“आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमचं ४८ जागांवर काम सुरू आहे. जर आघाडी झाली तर आमच्या पक्षाची ताकद त्यांना मिळेल. महाराष्ट्र असं राज्य आहे जिथे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. जे आमच्यासोबत येतील, त्यांना आमचा फायदाच होणार आहे”, असं नाना पटोले म्हणाले.

भाजपाविरोधात पदयात्रा काढणार

“महाराष्ट्रात जिल्हा आणि ब्लॉक पातळीवर पक्ष संघटन केलं जाईल. पदयात्रा काढली जाईल. या पदयात्रेतून नरेंद्र मोदी सरकारच्या आणि महाराष्ट्रातील तिघाडा सरकारमध्ये कसा ईडी आणि खोक्याचा वापर झालाय, भीती घालून महाराष्ट्राची विचारधारा विकत घेण्याचं काम मोदींनी केलं आहे हे जनतेत आम्ही जाऊन सांगणार आहोत. भाजपाचं सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. बेरोजगारी, महागाई वाढली आहे. गरिबांच्या या समस्या लक्षात घेऊन आम्ही जनतेपर्यंत पोहोचणार आहोत. भाजपा सत्तेसाठी काहीही करू शकते. पैशांतून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे भाजपाचं धोरण आहे, हे आम्ही जनतेला जाऊन सांगू”, असंही नाना पटोले म्हणाले.

बैठकीत काय ठरलं?

आजपासून महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, सर्व वरिष्ठ नेत्यांनी संसदीय मतदारसंघांची जबाबदारी स्वीकारण्याचे ठरवण्यात आले आहे. तसंच, सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये एकत्रित बस यात्राही काढण्यात येणार आहे, अशी माहिती के.सी. वेणुगोपाल यांनी माध्यमांना दिली.

Story img Loader