दहशतवादी बुरहान वानी लष्करी चकमकीत मारला गेल्यानंतर काश्मीरच्या खोऱ्यात मोठ्याप्रमाणावर अशांतता निर्माण झाली होती. आतापर्यंत स्थानिक जनता आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये झालेल्या चकमकीत ३० जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. याशिवाय, सुरक्षा यंत्रणांकडून जमावाला आवर घालताना गरजेपेक्षा अधिक प्रमाणात छऱ्यांच्या गोळ्यांचा वापर करण्यात आल्यामुळे अनेकजणांच्या डोळ्यांना दुखापत झाली आहे. यापैकी अनेकांना स्वत:ची दृष्टी कायमची गमवावी लागू शकते. हे विदारक चित्र केवळ एवढ्यापुरताच मर्यादित नाही. काश्मीरमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या स्थानिक दैनिकांमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. सध्याचा रमजाननंतरचा कालावधी म्हणजे काश्मीर खोऱ्यात अनेक समारंभांचा काळ असतो. या काळात विवाहसोहळे मोठ्याप्रमाणावर पार पडतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे तब्बल १०० विवाह समारंभ रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दैनिकांमध्ये समारंभ रद्द झाल्याच्या जाहिराती झळकत आहेत. अशाप्रकारच्या जाहिरातांनी वृत्तपत्राचे रकाने भरून गेल्याचे दिसत आहे. सध्याच्या कर्फ्युच्या परिस्थितीमुळे लोकांना लग्न आणि समारंभाना जाणे शक्य नाही. त्यामुळे संबंधितांकडून नातेवाईकांना आणि इतर लोकांना समारंभ रद्द झाल्याचा संदेश पोहचविण्यासाठी या जाहिरातींचा उपयोग केला जात आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या ‘ग्रेटर काश्मिर’ या वृत्तपत्रात अशाप्रकारच्या ३० जाहिराती होत्या.