वृत्तसंस्था, प्रातिस्लावा : चीनशी भारताचे संबंध ताणलेले आहेत. परंतु भारत त्याचे व्यवस्थापन करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. जर भारताला जागतिक समर्थन मिळाले तर ते नक्कीच उपयुक्त ठरेल. पण  मी एका संघर्षांत उतरावे कारण मला त्यातून दुसऱ्या संघर्षांत मदत होईल, या समजावर जग चालत नाही, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युरोपला फटकारले. चीनबरोबरच्या भारताच्या प्रश्नांचा युक्रेन संघर्षांशी काहीही संबंध नाही, रशियाशी सुद्धा नाही, असेही जयशंकर यांनी सुनावले.

आपले प्रश्न हे सर्व जगाचे प्रश्न आहेत, या मानसिकतेला युरोपने तिलांजली द्यावी, कारण जगाचे प्रश्न हे युरोपचे प्रश्न नाहीत, असे जयशंकर म्हणाले. स्लोव्हाकियातील ‘ग्लोबसेक २०२२’ परिषदेत युक्रेन संघर्षांवर भारताच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की भारत आणि चीन यांच्यातील संबंधाचा धागा युरोपातील संघर्षांशी जोडण्याच्या प्रयत्नांवर टीका केली. दोन भिन्न परिस्थितींची बादरायण सांगड घालण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचे स्पष्ट करीत त्यांनी युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाबद्दलच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

युक्रेनवरील हल्ल्याबाबत भारताने रशियावर टीका करावी, अशी युरोपातील काही देशांची अपेक्षा आहे. भारताला चीनच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी जगाच्या मदतीची आवश्यकता भासू शकते, असा त्या देशांचा तर्क आहे. परंतु भारताचे चीनशी संबधित अनेक प्रश्न आहेत, परंतु त्याचा युक्रेन किंवा रशिया यांच्याशी काडीचाही संबंध नाही, असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले.