नव्या संसद भवनाचं उद्घाटन रविवारी ( २८ मे ) रोजी होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी अधिनम ( तामिळनाडूचे संत ) संतांची भेट घेत आशीर्वाद घेतला. यावेळी अधिनम संतांनी ऐतिहासिक सेंगोल हे पंतप्रधान मोदींकडं सुपूर्द केलं. “सर्व संत माझ्या निवासस्थानी आले, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे,” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
“तामिळ परंपरेत सत्तेचा कारभार असणाऱ्यांकडे सेंगोल दिलं जात होतं. सेंगोल याचं प्रतिक आहे की, त्याची जबाबदारी असणारा व्यक्ती देशाचं कल्याण करेल. तसेच, आपल्या कर्तव्यापासून कधीही विचलीत होणार नाही,” असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
“देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तामिळनाडूने महत्वाची भूमिका बजावली आहे. भारताच्या स्वातंत्र्याबद्दल तामिळ लोकांच्या योगदानाला जे महत्वं द्यायला हवं होतं, ते दिलं गेलं नाही. मात्र, आता भाजपाने प्रखरतेने हा मुद्दा उपस्थित करण्यास सुरूवात केली आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
हेही वाचा : Video: कशी आहे आपली नवी संसद? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला आतला व्हिडीओ!
“सेंगोल हे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. पण, तुमचा सेवक आणि आमच्या सरकारने सेंगोलला आनंद भवनातून बाहेर आणलं आहे. नवीन संसद भवनात सेंगोलच्या स्थापनेवेळी स्वातंत्र्यानंतरचा पहिला क्षण पुन्हा अनुभवण्याची संधी मिळाली आहे,” असेही पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
कसा असेल उद्घाटन कार्यक्रम?
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ( २८ मे ) नव्या संसद भवनाचं उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी दुपारी १२ वाजता संसद भवनाचं उद्घाटन करणार आहेत. त्यापूर्वी ७ वाजता होम-हवनला सुरुवात होणार आहे. या पुजेला पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा अध्यक्षांसह मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर ८.३० ते ९ यावेळेत लोकसभेमध्ये सेंगोलची स्थापना करण्यात येणार आहे. पूजा आणि होम-हवननंतर दुपारी १२ नंतर दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यावेळी काही माहितीपट दाखवण्यात येतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत. दुपारी २ वाजेपर्यंत कार्यक्रमाची सांगता होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : सेंगोलबाबत केंद्राच्या दाव्यात ठोस पुराव्यांचा अभाव
कुठे पाहाल?
नव्या संसद भवनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सर्व चॅनेल्सवर पाहता येणार आहे. त्याचबरोबर दूरदर्शनच्या युट्यूब चॅनेलवरही थेट प्रक्षेपण पाहता येईल.