पीटीआय, अयोध्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शनिवारी अयोध्येत महर्षी वाल्कीमी विमानतळ तसेच पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहा वंदे भारत तसेच दोन अमृत भारत एक्स्प्रेसला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.
अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वाचा होता. यावेळी १५ हजार ७०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. यात ११ हजार कोटी रुपयांचा शहर विकासाच्या प्रकल्पांच्या समावेश आहे. तसेच ४६०० कोटी रुपयांचे प्रकल्प उत्तर प्रदेशात असतील.
पहिल्या टप्प्यातील कामांमध्ये अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाचा कायापालट २४० कोटी रुपये खर्च करून पूर्ण केला जाईल. तीन मजली स्थानकात अत्याधुनिक सुविधा आहेत. दरभांगा-अयोध्या- आनंद विहार टर्मिनल आनंद भारत एक्स्प्रेस तसेच माल्दा शहर-सर एम. विश्वेश्वरैय्या टर्मिनस (बंगळूरु) अमृत भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या. त्यानंतर पंतप्रधानांनी लता मंगेशकर चौकाला भेट दिली. तेथे भव्य वीणा उभारण्यात आली आहे.
हेही वाचा >>>मोदींनी भेट दिलेल्या कुटुंबातील महिलेची प्रतिक्रिया; म्हणाली, “अधिकारी आले अन् म्हणाले पुढच्या अर्ध्या तासात…”
भव्य विमानतळ
अयोध्येतील विमानतळावर नियोजित राम मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. तसेच अंतर्गत सजावटीत प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित भित्तीचित्रे साकारण्यात आलीत. विमानतळाच्या पहिल्या टप्प्याला १४५० कोटी रुपये इतका खर्च आहे. वर्षांला दहा लाख प्रवासी अयोध्येत येतील असा अंदाज आहे.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी चहापान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अयोध्या दौऱ्यावर असताना उज्ज्वला योजनेच्या १० कोटी लाभार्थी असणाऱ्या मीरा यांची लता मंगेशकर चौकाजवळील परिसरात त्यांच्या घरी भेट घेतली, तसेच त्यांच्या घरी चहा घेतला आणि संवाद साधला. पंतप्रधानांचा हा कार्यक्रम अगोदर ठरलेला नव्हता. अशा परिस्थितीत पंतप्रधान अचानक मीराच्या घरी आल्याने संपूर्ण कॉलनीतील लोक आश्चर्यचकित झाले. त्यांचे आगमन होताच संपूर्ण परिसर ‘मोदी-मोदी’च्या घोषणांनी दुमदुमून गेला. या वेळी मोदींनी मीराने बनवलेला चहा प्यायला. ते म्हणाले, ‘चहा चांगला आहे, पण थोडा गोड झाला आहे.’ या वेळी मोदींनी मीराच्या कुटुंबाची आणि संपूर्ण कॉलनीची स्थितीदेखील जाणून घेतली. त्यांनी योजनेच्या फायद्यांची माहिती घेतली. यावर मीराने पंतप्रधानांना सांगितले की, मला मोफत गॅस आणि राहण्याची सोय मिळाली आहे. पूर्वी माझ्याकडे कच्चे घर होते पण आता ते कायमस्वरूपी झाले आहे. आपण घरी आल्याने खूप आनंद झाला.पंतप्रधानांनी या वेळी एका मुलाला स्वाक्षरी दिली. यामध्ये त्यांनी वंदे मातरम् लिहिले आणि स्थानिक मुलांबरोबर छायाचित्रही काढले.
‘सुलभ रेल्वे प्रवास की छायाचित्र?’
’काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी रेल्वे स्थानकावरील सेल्फी बुथवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘कटआउट’बरोबर ‘सेल्फी’ घेतला. लोकांना सुलभ रेल्वे प्रवास हवा आहे की ‘शहेनशहाच्या पुतळय़ा’सह छायाचित्र हवे, असा सवाल करत त्यांनी ‘बूथ’ उभारण्यावरून सरकारवर निशाणा साधला.
’हे ‘सेल्फी स्टँड’ बनवण्यासाठी का? भारतीय जनतेला काय हवे आहे? स्वस्त गॅस सिलिंडर, सुलभ रेल्वे प्रवास की ‘शहेनशहा’च्या पुतळय़ाबरोबर छायाचित्र? अशी विचारणा करत राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये सरकारवर टीका केली.
‘अमृत भारत’च्या प्रवासाने विद्यार्थी खूश
अयोध्या: अयोध्या-दरभंगा या पहिल्या अमृत भारत एक्स्प्रेसमधून विद्यार्थी तसेच शिक्षकांनी प्रवास केला.सकाळी सव्वाबारा वाजता ही गाडी अयोध्या धाम जंक्शन येथून सुटली. यातील अनेक गोरखपूर येथून आले होते. पहाटे तीन वाजता आम्ही उठलो, त्यानंतर पाचची गाडी पकडली आता पुन्हा गोरखपूरला परतत आहोत असे एका विद्यार्थ्यांने सांगितले.
ही नवी गाडी अत्याधुनिक असल्याने आरामदायी प्रवास झाल्याचे एका विद्यार्थ्यांने स्पष्ट केले.चार हजार विद्यार्थ्यांपैकी शैक्षणिक गुणवत्तेच्याआधारे ४८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. रेल्वे कर्मचारी, पत्रकार तसेच सुरक्षारक्षकांनीही प्रवास केला. बाराशे पास देण्यात आले होते.