पीटीआय, उज्जैन : उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराभोवती उभारण्यात आलेल्या ‘महाकाल कॉरिडॉर’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. ९०० मीटर लांबीच्या या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे.
पंतप्रधानांसमवेत मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी या मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित साधूंना अभिवादन केले. महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर विकास प्रकल्प भगवान शिवाला समर्पित असून भारतातील १२ ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या या ज्योतिर्लिगाला भेट देणाऱ्यांसाठी चांगल्या सुविधा प्रदान करेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ‘महाकाल लोक कॉरिडॉर’च्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी भगवान महाकाल मंदिरात जाऊन पूजा केली. पंतप्रधानांनी सायंकाळी ६ वाजता मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला. त्यांच्यासोबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कॉरिडॉरसाठी दोन भव्य प्रवेशद्वारे उभारण्यात आली आहेत. नंदी द्वार आणि पिनाकी द्वार. ही दोनही द्वारे काही अंतरावर असून मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत या दोन्ही महाद्वारांतून जाता येईल. या कॉरिडॉरमध्ये शिव पुराणमधील कथा दर्शविणारी ५० हून अधिक भित्तिचित्रे आहेत. वाळूच्या दगडांनी तयार करण्यात आलेले १०८ सुशोभित स्तंभ आहेत. कॉरिडॉरमध्ये विविध देवतांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत, त्याशिवाय हिंदू धर्मातील विविध कथा सांगणाऱ्या मूर्तीही बसवण्यात आल्या आहेत. कॉरिडॉरमधील १०८ स्तंभांवर आनंद तांडव दाखवणारे दृश्य, भगवान शिव व देवी शक्ती यांची भित्तिचित्रे आणि २०० मूर्ती आहेत.
८५६ कोटी रुपये खर्च
देशातील सर्वात मोठय़ा कॉरिडॉरपैकी एक असलेला ‘महाकाल लोक’ कॉरिडॉर ९०० मीटरपेक्षा जास्त लांबीचा असून जुन्या रुद्रसागर तलावाभोवती पसरलेला आहे. या कॉरिडॉरसाठी ८५६ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही सुरू आहे. पहिल्या टप्प्यासाठी ३१६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.