Sam Pitroda Statement On China: इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान केले आहे. भारत-चीन मुद्दा अमेरिकेने अतिशयोक्तीपूर्णपणे मांडला आहे. चीनला आपला शत्रू मानणे योग्य नाही, असे सॅम पित्रोदा म्हणाले होते. त्यानंर सॅम पित्रोदा यांच्या विधानावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. आता काँग्रेस डॅमेज कंट्रोल मोडमध्ये आली असून, सॅम पित्रोदा यांच्या विधानाशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबध नसल्याचे म्हटले आहे. याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
काँग्रेसची भूमिका
“सॅम पित्रोदा यांनी चीनबद्दल व्यक्त केलेले विचार निश्चितच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विचार नाहीत,” असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. मोदी सरकारवर हल्लाबोल करताना रमेश म्हणाले, “चीन हे आमचे प्राथमिक परराष्ट्र धोरण, बाह्य सुरक्षा आणि आर्थिक आव्हान आहे. काँग्रेसने मोदी सरकारच्या चीनप्रती असलेल्या दृष्टिकोनावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, ज्यामध्ये १९ जून २०२० रोजी पंतप्रधानांनी त्यांना जाहीर क्लीन चिट दिली होती. चीनबद्दल आमचे अलीकडील विधान २८ जानेवारी २०२५ रोजी होते.”
काय म्हणाले होते सॅम पित्रोदा?
आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले की, “चीनकडून काय धोका आहे मला समजत नाही. मला वाटते की हा मुद्दा अनेकदा अवास्तवपणे उचलला जातो कारण अमेरिकेला शत्रूची व्याख्या करण्याची सवय आहे. माझा असा विश्वास आहे की सर्व देशांनी एकमेकांशी लढण्याची नाही तर सहकार्य करण्याची वेळ आली आहे. आपल्याला ही पद्धत बदलण्याची गरज आहे. चीन हा शत्रू आहे असे मानणे योग्य नाही. आता आपण संवाद वाढवण्यास शिकण्याची वेळ आली आहे. सहकार्य करा आणि विकास साधा.”
भाजपाकडून टीका
सॅम पित्रोदा यांच्या विधानावर भाजपाने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले. सॅम पित्रोदा यांच्या विधानावर सुधांशू त्रिवेदी म्हणाले, “सॅम पित्रोदा यांनी काँग्रेस पक्षाचा चीनसोबतचा करार उघडपणे समोर आणला आहे. गंभीर गोष्ट अशी आहे की, सॅम पित्रोदा यांनी जे काही म्हटले आहे ते भारताच्या प्रतिमेवर, राजनैतिकतेवर आणि सार्वभौमत्वावर खोलवर आघात करणारे आहे.”