पंजाब येथे पटियाला येथे असलेल्या गुरुद्वारा परिसरात एका महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही महिला गुरुद्वारा परिसरात मद्यपान करत होती, त्यामुळे एका भक्ताने त्याच्याकडील परवाना असलेल्या पिस्तुलाने गोळ्या झाडल्या. याप्रकरणात एक स्वयंसेवकही जखमी झाला आहे.
निर्मलजीत सिंह असं गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचं नाव असून त्याने पिस्तुलातून अनेक गोळ्या झाडल्या होत्या. यामुळे ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. गुरुद्वारात महिला मद्यप्राशन करत असल्याने त्याच्या धार्मिक भावना दुखावल्या, अशी माहिती पोलीस अधिक्षक वरून शर्मा यांनी दिली. गुरुद्वारात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी गोळ्या झाडणाऱ्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या हवाली केलं.
जखमी झालेला स्वयंसेवक सागर कुमार सध्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय. मृत झालेल्या महिलेचं नाव कुलविंदर कौर असून ती घटस्फोटित महिला होती. ती झिरकापूर येथे एका सलूनमध्ये कामाला होती. तिला दारूचं व्यसन होतं. त्यामुळे व्यसन सुटण्यासाठी तिच्यावर उपचारही सुरू होते.
सीसीटीव्ही फुटेजचा हवाला देत पोलीस म्हणाले की, “ही महिला रविवारी रात्री एकटीच मंदिरात आली होती. तिला पूर्वीपासूनच दारुचे व्यसन होते.” हा प्रकार रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडला. रात्री गुरुद्वाराच्या परिसरात असलेल्या तलावावर बसून ही महिला मद्यप्राशन करत होती. कर्मचाऱ्यांनीही तिला तेथून हटकलं. परंतु, निर्मलजीत यांनी क्षणात या महिलेवर गोळीबार केला. त्याच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्यामुळे त्याने तत्काळ गोळीबार केला. पोलिसांनी निर्मलजीतचे पिस्तुल जप्त केले असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.