आंध्र प्रदेशला शुक्रवारी जोरदार पावसाने झोडपले असून त्यात १७ जण मृत्युमुखी पडले. सखल भागातील ६७,४१९ लोकांची पुरातून सुटका करण्यात आली. लागोपाठ चौथ्यादिवशी राज्यात जोराचा पाऊस झाला, त्यामुळे पुरात १७ जण मृत्युमुखी पडले व दोन जण बेपत्ता झाले आहेत. दरम्यान, ओडिशातही मुसळधार पावसाने १० बळी घेतले आहेत.
आंध्र प्रदेशच्या राज्यात किनारी जिल्ह्य़ात १३५ मदत छावण्या सुरू असून त्यांना पुराचा व पावसाचा फटका बसला आहे. अडीच लाख हेक्टर क्षेत्रातील भात, मका, डाळी ही पिके वाहून गेली आहेत. पावसाने काही भाग पाण्याखाली गेले असून नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रसिदा दलाची नऊ पथके मदतीसाठी तैनात करण्यात आली आहेत. पुरामुळे ३०५० घरांचे नुकसान झाले आहे. ११० गुरे वाहून गेली आहेत. छोटे ११७ पाटबंधारे फुटले असून काही ठिकाणी कडे कोसळले आहेत, त्यामुळे कुर्नुल जिल्ह्य़ात श्रीशैलमकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. हवामान खात्याच्या कार्यालयाने सांगितले की, येत्या काही दिवसात आंध्र प्रदेशातील किनारी भाग व तेलंगणात जोरदार पावसाची शक्यता आहे. रायलसीमा भागातही पावसाची शक्यता आहे. ईशान्य मान्सून व बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा यामुळे आंध्र प्रदेश, किनारी आंध्र प्रदेश व रायलसीमा या भागात जोरदार पाऊस पडत आहे.अनेक शहरात पाणी साठले असून सार्वजनिक वाहतूक कोलमडली आहे. हैदराबाद येथे जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साठले आहे.
ओडिशालाही तडाखा
कमी दाबाच्या पट्टय़ाने ओडिशात पाच दिवसात जोरदार पाऊस झाला असून त्यामुळे आलेल्या  पुरात १० लोक मृत्युमुखी पडले व लाखो लोक अडकून पडले आहेत, त्यांना हेलिकॉप्टरने सोडवण्याचे काम सुरू आहे. वादळाने गंजम व इतर किनारी जिल्ह्य़ांना झोडपून काढले, त्यानंतर आता पावसाचे दुसरे अस्मानी संकट ओडिशा झेलत आहे.
राज्याचे पुनर्वसन आयुक्त पी.के.मोहपात्रा यांनी सांगितले की, गंजम जिल्ह्य़ात चार जण पुरात वाहून गेले तर जगतसिंगपूर जिल्ह्य़ात घराची भिंत कोसळून चार जण मरण पावले. आतापर्यंत पासष्ट हजार लोकांना पुरातून सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
गंजम जिल्ह्य़ात तीन हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आली व अडकलेल्यांची सुटका करण्यात आली. तेथे ऋषीकुल्या, गोढादा नद्यांना पूर आले आहेत. घराच्या छपरावर जीव वाचवण्यासाठी बसलेल्यांना हेलिकॉप्टर्सच्या साहाय्याने सोडवले. गंजम, गजपती, रायगडा, नायगड या सर्व जिल्हयातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
गंजम जिल्ह्य़ातील पूरस्थिती भीषण असून हजारो लोक पुरात अडकले आहेत. आस्का, सोरडा, हिंजली, सेरगडस बेलागुंठा व रंगेलुनंदा या नद्यांना पूर आले आहेत. खुर्दा, जगतसिंगपूर, पुरी, कटक, नायगड, केंद्रपारा, भद्रक, बालासोर, मयूरभंज व जाजपूर या जिल्ह्य़ांना पुराचा फटका बसला आहे. आस्का येथे आपत्ती व्यवस्थापन दलाने ९ लोकांची सुटका केली असे गंजमचे जिल्हाधिकारी किशन कुमार यांनी सांगितले. अनेक ठिकाणी आता पुरामुळे आत जाणे व बाहेर पडणे शक्य नाही, पूर ओसरला तरच काही करता येईल. राज्य सरकारने किनारी जिल्ह्य़ातील शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. गेल्या पाच दिवसातील पावसाने भुवनेश्वर व कटकच्या सखल भागात पाणी घुसून वाहतूक विस्कळीत झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा