राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात पुन्हा एकदा मॉब लिंचिंगची घटना समोर आली आहे. ही घटना अलवर जिल्ह्यातील बडोदामेव पोलीस स्टेशन परिसरातील मीना का बास गावाची आहे. येथे १५ सप्टेंबर रोजी एक १७ वर्षीय दलित अल्पवयीन बाईकवरुन त्याच्या घरी जात होता. वाटेत एका दुरावस्थेत असलेल्या रस्त्यावर दुर्घटना टाळण्याच्या प्रयत्नात त्याची बाईक एका मेव समाजाच्या १० वर्षांच्या मुलीला धडकली. यावेळी त्या मुलीसोबत असणाऱ्या महिलांनी या अल्पवयीन मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. पुढे काही वेळातच एका विशिष्ट समाजातील लोकांचा जमाव तिथे जमला आणि या अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली. ह्यात गंभीर जखमी झालेल्या या अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृत मुलाच्या नातेवाईकांनी आणि भाजपाने यावरून सरकारला घेरलं आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश जाटव यांचा मुलगा ओमप्रकाश १५ सप्टेंबर रोजी मीना का बास गावातून त्याच्या घरी भटपूर येथे जात होता. दरम्यान, मीना का बास गावाकडे जाणारा रस्ता हा पावसामुळे खराब झाला आहे. यावेळी, दुर्घटना टाळण्याच्या प्रयत्नात त्याची दुचाकी एका १० वर्षांच्या मुलीला धडकली. यानंतर जमावाने त्याचा मार्ग अडवला आणि त्याला बेदम मारहाण केली. ह्यात मुलीसोबत जाणाऱ्या महिलांचा देखील समावेश होता. यावेळी त्याला गंभीर मारहाण झाली. या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या या अल्पवयीन मुलाच्या नातेवाईकांनी प्रथम योगेशला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. पण, त्यांची प्रकृती खूप जास्त बिघडली. त्यानंतर, १६ सप्टेंबर रोजी त्याला जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान रुग्णालयात शनिवारी (१८ सप्टेंबर) रात्री उशिरा या अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रविवारी दुपारी मृत मुलाच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी मृतदेह अलवर-भटपूर रस्त्यावर ठेवून या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त केला. त्याचसोबत, मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि आरोपींना अटक करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. अखेर प्रशासनाने समजूत काढल्यानंतर मृताचे नातेवाईक संध्याकाळी उशिरा मृतदेह अंतिम संस्कार करण्यास तयार झाले. मृताचे वडील ओमप्रकाश यांनी रशीद, मुबीना, साजेत पठाण आणि इतर तिघांविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि हत्येची तक्रार दाखल केली आहे. तर मृताच्या नातेवाईकांनी बडोदा मेव पोलीस ठाण्याचे अधिकारी इलियास यांच्यावर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाची देखील मागणी केली आहे.
भाजपाने सरकारला घेरलं!
भाजपाचे आमदार मदन दिलावर याविषयी म्हणाले की, “दलित अल्पवयीन मुलासोबत मॉब लिंचिंग हा गुन्हा आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या प्रकरणी उत्तर द्यावं. दलितांवरील गुन्हे सातत्याने वाढत आहेत.” तर माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी एका विशिष्ट समाजातील लोकांवर मॉब लिंचिंगचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, या प्रकरणात आरोपीविरोधात मॉब लिंचिंगच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला पाहिजे. जणांविरोधात नावाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचसोबत, या मुद्द्यावर भाजपाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून उत्तर मागितलं आहे.