Parliament Winter Session 2023 Updates: आज संसदेवरच्या हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच दिवशी दोन तरुण लोकसभेत शिरले होते. त्यांनी लोकसभेत पिवळ्या धुराचे लोट पसरवले. यानंतर लोकसभेत एकच गदारोळ झाला. खासदारांनी अत्यंत हिंमतीने या दोघांनाही पकडलं आणि सुरक्षा दलांच्या ताब्यात दिलं. या दोघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांची आता चौकशी सुरु आहे. सुरक्षेचा इतका कठोर बंदोबस्त असताना पिवळ्या धुराचे कॅन घेऊन हे दोन तरुण आत कसे काय शिरले? याविषयी प्रश्न निर्माण होतो आहे. सगळे खासदार बाहेर पडले आणि लोकसभेचं कामकाजही थांबवण्यात आलं. जे आता सुरु करण्यात आलं आहे. सुरुवातीलाच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या पिवळ्या धुराबाबत आणि तरुणांबाबत महत्त्वाची माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले ओम बिर्ला?

“लोकसभेत शून्य प्रहरात जी घटना घडली होती त्याबाबत आपल्या सगळ्यांनाच चिंता होती आणि आहे. लोकसभा या घटनेची संपूर्ण सखोल चौकशी करते आहे. या संदर्भात दिल्ली पोलिसांनाही आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आपल्या सगळ्यांना जी चिंता वाटत होती की ज्या धुराचे लोट पसरवण्यात आले तो धूर नेमका काय होता? प्राथमिक तपासात हे समोर आलं आहे की तो धूर सर्वसाधारण धुराप्रमाणेच होता. फक्त काहीतरी गदारोळ घडला पाहिजे या उद्देशाने या धुराचे लोट पसरवले गेले. तो धूर हा चिंतेचा विषय नाही, प्राथमिक चौकशीच्या नंतरच मी हे आपणाला सांगतो आहे.” असं ओम बिर्ला यांनी स्पष्ट केलं.

आम्ही या घटनेची चौकशी करतो आहोत

“या घटनेबाबत आम्ही कुणालाही दोष देत नाही. आम्ही या घटनेची चौकशी करतो आहोत. लोकसभा अध्यक्ष म्हणून ही माझी जबाबदारी आहे. मी या घटनेची स्वतः चौकशी करतो आहे, कोण लोक आले होते याची माहिती मी घेतो आहे. जो विषय खासदार मांडत आहेत ती चिंता आम्हाला सगळ्यांना आहे. प्राथमिक तपासानंतर दोघांनाही पकडण्यात आलं आहे. त्यांच्याकडे ज्या ज्या गोष्टी होत्या त्या जप्त करण्यात आल्या आहेत. जे दोन लोक बाहेर होते त्यांनाही अटक करण्यात आली आहे.”

अधीर रंजन चौधरी काय म्हणाले?

ओम बिर्ला यांच्या या माहितीनंतर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले, “अध्यक्ष महोदय आज सकाळी आपण संसदेवर जो हल्ला झाला त्यात जे शहीद झाले त्यांना आपण श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान असोत, सोनिया गांधी असोत सगळ्याच व्यक्ती होत्या. याच दिवशी हा प्रकार घडला आहे. ही घटना कशी काय घडली? सुरक्षेत कुठे चूक घडली का? सगळ्या खासदारांनी हिंमत करुन त्या दोघांना पकडलं. मात्र संसदेची सुरक्षा दल जे हत्यारांशिवाय असतात ते फार प्रमाणात आज दिसले नाहीत हे तीन विषय लक्षात घ्यावेत” असं चौधरी म्हणाले आहेत.आपण या सगळ्या बाबत चिंता व्यक्त केली पाहिजे. आरोप-प्रत्यारोप करायला नकोत असं ओम बिर्ला म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Incident that happened during zero house that is being investigated by the lok sabha and delhi police has been given requisite directions said om birla scj