जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घटनेमुळे देशाच्या परदेशातील प्रतिमेला तडा जाणार नाही, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त के ला. कुठलाही देश विभाजनवादी कारवायांची वक्तव्ये सहन करू शकत नाही किंबहुना तसाच कार्यक्रम कुणी हाती घेतला असेल तर त्याचे समर्थन करता येणार नाही व सरकारने त्यानुसारच भूमिका घेतली असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जे घडले त्याचा परिणाम देशाच्या प्रतिमेवर होणार नाही, कारण कुठलाही देश कितीही उदारमतवादी असला तरी जे लोक देश तोडण्याची भाषा करतात त्यांना थारा देऊ शकत नाही इतके स्वच्छ आमचे मत आहे. भारतातील समाज उदारमतवादी ,लोकशाहीवादी आहे. आमच्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण घटनात्मक तरतुदींचे पालन करायचे म्हटले तरी सार्वभौमत्वाचा बळी देऊन भाषण स्वातंत्र्य देण्याचे समर्थन होऊ शकत नाही.

प्राथमिक चौकशी अहवाल देण्यास जेएनयूचा नकार
नवी दिल्ली- जेएनयू संकुलात ९ फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेची तीन प्राध्यापकांमार्फत चौकशी करण्यात आली असून त्यांनी सादर केलेला प्राथमिक अहवाल जाहीर करण्यास विद्यापीठाने नकार दिला आहे. माहितीच्या अधिकारातील सवलतींच्या कलमांचा आधार घेत विद्यापीठाने म्हटले आहे की, संकुलात घडलेला प्रकार आणि त्यानंतरच्या घटना यांची विद्यापीठाच्या स्तरावर चौकशी सुरू आहे. सदर माहिती दिल्यास चौकशीत अडथळा कसा येईल याची कारणे न देताच विद्यापीठाने पारसनाथसिंह यांना माहिती देण्यास नकार दिला. चौकशीची प्रक्रिया सुरू आहे हे माहिती न देण्यास पुरेसे कारण नाही, माहिती दिल्याने चौकशी प्रक्रियेत असा अडथळा येईल याचे समाधानकारक कारण दिले पाहिजे, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र भट यांनी नोंदविले होते.