Indigo Airline : देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी असलेल्या इंडिगोला आयकर विभागाने दणका दिला आहे. इंडिगोची मूळ कंपनी असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनला आयकर विभागाने तब्बल ९४४.२० कोटींचा दंड ठोठावल्याचा आदेश जारी केला असल्याची माहिती समोर आली आहे. आयकर विभागाने या संदर्भातील नोटीस कंपनीला पाठवली असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आयकर विभागाच्या या आदेशाला कंपनीने चुकीचं म्हटलं असून या आदेशाला कायदेशीर आव्हान देण्यात येणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

एअरलाइन्स इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडने रविवारी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की, त्यांना २०२१-२२ या कर निर्धारण वर्षासाठी आयकर विभागाने ९४४.२० कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची नोटीस आली आहे. मात्र, आयकर विभागाच्या या आदेशाला आव्हान देण्यासाठी कायदेशीर उपाययोजना केल्या जातील, असं एव्हिएशन लिमिटेडने स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

तसेच आयकर विभागाच्या या आदेशाचा एअरलाइनच्या कामकाजावर आर्थिक किंवा इतर कामांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. या संदर्भात एअरलाइनने एका निवेदनात म्हटलं की, “आयकर प्राधिकरणाने २०२१-२२ या करनिर्धारण वर्षासाठी ९४४.२० कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. दरम्यान, कलम १४३(३) अंतर्गत करनिर्धारण आदेशाविरुद्ध आयकर आयुक्त यांच्यासमोर कंपनीने दाखल केलेलं अपील फेटाळण्यात आलं, तसेच ते अद्याप प्रलंबित आहे. पण चुकीच्या समजुतीच्या आधारे हा आदेश पारित करण्यात आला असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

दरम्यान, कंपनीने या दाव्यांचे खंडन करताना म्हटलं की, “हा निर्णय चुकीच्या समजुतीवर आधारित आहे, त्यात कायदेशीर वैधता नाही. पण तरीही एअरलाइन योग्य त्या कायदेशीर मार्गांनी या आदेशाला आव्हान देईल. तसेच आमचा न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास असून आयकर विभागाने दिलेला आदेश कायद्यानुसार नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, आयकर विभागाने दंडाचे आदेश दिल्यानंतर इंडिगोच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. इंडिगोच्या शेअर्स ०.३२ टक्क्यांनी घसरून ५,११३ रुपयांवर स्थिरावले आहेत.