भारतीय उद्योगपती अनिल अंबानींना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. स्विस बँकेत ठेवलेल्या बेहिशेबी मालमत्तेवर ४२० कोटींचा कर चुकवल्याच्या आरोपाखाली ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अंबानी यांना या नोटिशीला उत्तर देण्यास सांगण्यात आलं असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. महिन्याच्या सुरुवातीला ही नोटीस पाठवण्यात आली होती.
ही रक्कम काळा पैसा असल्याचा आरोप
पीटीआयनुसार, ८१४ कोटी रुपयांची मालमत्ता लपवल्याचा आरोप अनिल अंबांनीवर आहे. दोन परदेशी बँकांमध्ये त्यांनी हे पैसे ठेवले असून या रकमेवरचा ४२० कोटींचा कर चुकवला असल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे. ही रक्कम काळा पैसा असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अंबानी यांचे बहामाज येथील डायमंड ट्रस्ट ही ड्रीमवर्क होल्डिंग्ज इंक नावाची कंपनी चालवते. या कंपन्यांमधून आलेली रक्कम अनिल अंबानींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता अनिल अंबानींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
अन्यथा १० वर्षाचा तुरुंगवास..
आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार अंबानी यांनी जाणूनबुजून कर चुकवला तसेच परदेशी बँक खात्यात जमा केलेल्या रकमेबद्दल भारतीय कर अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही. या संदर्भात ऑगस्टच्या सुरुवातीला अनिल अंबानी यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. अनिल अंबानी यांच्यावर काळा पैसा (अनडिस्क्लोज्ड फॉरेन इनकम अँड ॲसेटस) इम्पोझिशन ऑफ टॅक्स कायदा २०१५ च्या कलम ५० आणि ५१ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते, ज्यामध्ये दंडासह कमाल १० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.