भाजपची सत्ता आली तर आपल्यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना बघून घेऊ, अशी धमकी दिल्याबद्दल प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या संघटनेने भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्यावर टीका केली असून गडकरींनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
करचुकवेगिरीच्या प्रकरणात तपास सुरू असताना गडकरी यांनी केलेली ही विधाने धक्कादायक तर आहेतच पण तपास अधिकाऱ्यांवर दडपण आणण्याचाही तो प्रयत्न आहे, असे संघटनेने म्हटले आहे.
पूर्ती कंपनीच्या करचुकवेगिरीबाबत प्राप्तिकर खात्याने कारवाई सुरू करताच गडकरी यांनी भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नागपुरात कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी प्राप्तिकर अधिकाऱ्यांना धमकावले. ते म्हणाले की, भाजपचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर मर्यादा होती आता मी पद सोडल्याने स्वतंत्र आहे. काँग्रेसचे जहाज बुडत आहे आणि ते बुडून भाजप सत्तेवर आले तर या अधिकाऱ्यांना वाचवायला सोनिया किंवा चिदम्बरम येणार नाहीत.
गडकरी यांची ही विधाने धक्कादायक आणि अवमानास्पदही आहेत. निष्पक्ष चौकशीत अडथळे आणण्याचाही हा प्रयत्न आहे, असा ठरावच संघटनेच्या बैठकीत रविवारी केला गेला. पूर्ती कंपनीची चौकशी करीत असलेल्या मुंबई, पुणे आणि नागपूर येथील प्राप्तिकर अधिकाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणीही संघटनेने केली आहे. या १ फेब्रुवारीला प्राप्तिकर खात्याने गडकरी यांना नागपूर येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहाण्यास सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा