अल्वरमधील एका ३० वर्षीय इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरने पत्नीची हत्या करुन राहत्या घरातच तिचा मृतदेह दफन केला. वडोदऱ्याच्या हारनी भागात ही धक्कादायक घटना घडली. लोकेश चौधरी असे आरोपीचे नाव आहे. लोकेशने पत्नी मुनेशची (२८) हत्या केल्यानंतर घरातच सहा फुटाचा खड्डा खणून त्यामध्ये पत्नीचा मृतदेह पुरला. या थरकाप उडवणाऱ्या कृत्यानंतर संशयाची सुई आपल्याकडे येऊ नये यासाठी त्याने जयपूर पोलीस स्थानकात गांधीनगरमधून पत्नीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली.
मूळचा राजस्थान अल्वरचा असलेल्या लोकेश चौधरीची वडोदऱ्याला पोस्टींग झाली होती. त्याने पत्नी मुनेशला जयपूरहून वडोदऱ्याला बोलवून घेतले. त्यानंतर त्याने मित्राच्या मदतीने ११ एप्रिलला पत्नीची हत्या केली. जेव्हा संशयाची सुई लोकेशच्या दिशेने वळली तेव्हा त्याने पत्नीला शोधता येत नसल्याबद्दल पोलिसांवरच उलटे आरोप केले. जेव्हा पोलिसांनी लोकेशची कसून चौकशी केली तेव्हा त्याने आपले दुसऱ्या मुलीवर प्रेम होते म्हणून मुनेशची हत्या केल्याची कबुली दिली.
लोकेशचे २०१७ मध्ये मुनेशबरोबर लग्न झाले. त्याचवेळी अल्वरमध्ये राहणाऱ्या दुसऱ्या एका मुलीबरोबर त्याचे सूर जुळले. ती मुलगी लोकेशला मुनेशला घटस्फोट देऊन तिच्याबरोबर लग्न करायला सांगत होती. कौटुंबिक आणि कायदेशीर कारणांमुळे घटस्फोट देणे शक्य नसल्याने त्याने मित्राच्या मदतीने पत्नीच्या हत्येचा कट रचला. मुनेश घरी आल्यानंतर चौधरी आणि त्याच्या मित्राने गळा आवळून तिची हत्या केली व घरातच आधीपासून खणून ठेवलेल्या खड्डयात तिचा मृतदेह पुरला.