कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील मंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी संबंधित मालमत्तांवर आयकर विभागानं आज तिसऱ्या दिवशीही छापे टाकले. आतापर्यंत ७० ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. या ठिकाणी घेतलेल्या झाडाझडतीत १५ कोटींहून अधिक रक्कम आणि दागिने हाती लागले आहेत. मात्र, मिळालेली रक्कम आणि दागिने डी. के. शिवकुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नाहीत, असा दावा त्यांचे बंधू डी. के. सुरेश यांनी केला आहे.

गुजरातमध्ये ८ ऑगस्टला राज्यसभा निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसमध्ये फूट पडली होती. सहा आमदारांनी राजीनामे दिले होते. तर आणखी काही आमदार राजीनामे देण्याच्या तयारीत होते. त्यामुळं खबरदारी म्हणून काँग्रेसनं पक्षाच्या ४० हून अधिक आमदारांना बंगळुरूला हलवलं. ते आमदार ज्या ईगलटोन रिसॉर्टमध्ये थांबले होते, त्या रिसॉर्टवर आयकर विभागानं बुधवारी छापेमारी केली. रिसॉर्ट काँग्रेसचे नेते आणि मंत्री डी. के. शिवकुमार यांचे आहे. त्यामुळं शिवकुमार अडचणीत आले आहेत. आज तिसऱ्या दिवशीही आयकर विभागानं शिवकुमार यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी केली. आतापर्यंत ७० ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. या ठिकाणी घेतलेल्या झाडाझडतीत १५ कोटींहून अधिक रक्कम आणि दागिने हाती लागले आहेत. पण ते शिवकुमार किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाहीत, असा दावा डी. के. सुरेश यांनी केला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला दूरध्वनीवरून पाठिंबा दिला आहे. तसंच ही कारवाई राजकीय सूडभावनेतून केल्याचे ते म्हणाले, असे सुरेश यांनी सांगितले. याआधी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनीही ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, शिवकुमार यांच्या मालमत्तांवर छापे टाकल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसनंही भाजपवर टीका केली होती. भाजप राजकीय सूडभावनेतून ही कारवाई करत असल्याचा आरोप करत हा मुद्दा संसदेतही उपस्थित केला होता. त्यावर गुजरातमधील राज्यसभा निवडणूक आणि शिवकुमार यांच्या मालमत्तांवरील छाप्यांचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण अरुण जेटली यांनी दिलं होतं.

Story img Loader