आयकर विभागाने मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांच्या फंडिंग प्रकरणी महाराष्ट्रासह देशभरात छापेमारी केली आहे. यात दिल्ली, हरियाणा आणि गुजरातचाही समावेश आहे. दिल्लीत टॉप थिंक टँक, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (CPR) या संस्थांवर छापे टाकण्यात आले. आयकर विभागाने नोंदणी असलेल्या मात्र मान्यता न मिळालेल्या २० पेक्षा अधिक राजकीय पक्षांच्या फंडिंग प्रकरणी ही कारवाई केली आहे.
आयकर विभागाने देशभरात जवळपास ११० ठिकाणांवर छापे टाकले आहेत. यात महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आणि इतर काही राज्यांचा समावेश आहे. या कारवाईत आयकर विभागाने पोलीस विभागाचीही मदत घेतली आहे.
नोंदणी असलेल्या आणि मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना मिळालेल्या निधीबाबत आयकर विभाग ठिकठिकाणी छापेमारी करत आहे. यात या पक्षांशी संबंधित प्रमोटर्स आणि संस्थांच्या प्रमुखांचं उत्पन्न आणि खर्च याचेही तपशील तपासले जाणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून ही कारवाई झाल्याचं बोललं जात आहे. आयोगाने राजकीय पक्षांना फंडिंग करणाऱ्या जवळपास १९८ संस्थांची यादी तयार केली होती. या संस्थांनी दिलेल्या पत्त्यावर त्या संस्थांची कार्यालयं आढळलेली नाहीत. यानंतर पोल पॅनलने अशा २,१०० संस्थांवर कारवाईला सुरुवात केली. त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या कायद्याचं आणि नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच या संस्थांनी आपला पत्ता आणि संचालकांची नावं अपडेट केली नसल्याचंही आयोगाने म्हटलं आहे.
हेही वाचा : अभिजीत पाटलांच्या पंढरपूर, उस्मानाबादसह राज्यातील विविध साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे
या सर्व संस्थांना निवडणूक आयोगाने पत्र व्यवहार केला. मात्र, ही पत्रे संबंधित संस्थांना पोहचली नाही. विविध राज्यांच्या निवडणूक आयोगाकडून पोल पॅनलला अशा संस्थांबाबत तक्रारी आल्यानंतर आयकर विभागाकडे त्यांच्यावर कारवाई सुरू झाली.