‘लॅन्सेट’ प्रसिद्धीपूर्व संशोधन निबंधातील निष्कर्ष
ऑक्सफर्ड- अॅस्ट्राझेनेकाची एक मात्रा व फायझर बायोएनटेकची दुसरी मात्रा अशा पद्धतीने करोनावर संमिश्र लशींचा वापर केल्यास प्रतिकारशक्तीची परिणामकारता वाढते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेले हे संशोधन अजून प्रसिद्ध करण्यात आले नसले तरी त्याचा शोधनिबंध हाती आला आहे.
फायझरनंतर अॅस्ट्राझेनेका किंवा अॅस्ट्राझेनेकानंतर फायझर अशा संमिश्र मात्रा घेतल्यास प्रतिपिडांचे प्रमाण वाढून करोनाच्या विषाणूला अटकाव होतो. सार्स कोव्ह २ म्हणजे करोना विषाणूच्या काटेरी प्रथिनाचा प्रतिकार करणारे हे प्रतिपिंड असतात. काटेरी प्रथिनामुळेच विषाणू मानवी पेशीत प्रवेश करू शकतो व सध्याच्या सर्व लशी त्यावरच मारा करीत आहेत. लॅन्सेटच्या प्रिप्रिंट सव्र्हरवर हा शोधनिबंध टाकण्यात आला आहे.
२५ जूनच्या या शोधनिबंधात म्हटले आहे की, अॅस्ट्राझेनेका म्हणजे कोविशिल्ड व फायझर अशा संमिश्र मात्रा घेता येऊ शकतात व त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. यातून लसीकरणाचा वेग वाढवण्यासही मदत होऊ शकेल. कारण फायझरच्या जास्त मात्रा उपलब्ध आहेत. कोव्हिशिल्डच्या पुरेशा मात्रा तयार नाहीत. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेत लवचिकता आणण्याचा उद्देशही साध्य होईल.
संशोधन काय…
’ एकूण ८३० व्यक्तींवर प्रयोग केले असता त्यात ४३० जणांना २८ दिवसांच्या अंतराने दुसरी मात्रा देण्यात आली.
’ ५७.८ इतक्या सरासरी वयाच्या ४५.८ टक्के महिला व २५.३ टक्के इतके विविध वांशिक गटातील पुरुष यांच्यावर हे प्रयोग करण्यात आले. यातून असे दिसून आले की, संमिश्र लस मात्रांमुळे चार आठवड्यांत अॅस्ट्राझेनेकापेक्षाही जास्त प्रतिपिंड तयार होऊन प्रतिकारशक्ती वाढते.
’ ऑक्सफर्ड विद्यापीठातील लसशास्त्र व बालरोग विषयातील तज्ज्ञ मॅथ्यू यांनी सांगितले की, या दोन्ही लशींचा संमिश्र वापर केल्यास जास्त चांगला परिणाम दिसून येतो. प्रतिपिंडांची संख्या या प्रयोगात वाढलेली दिसली.
’ टी पेशींचा प्रतिसादही सुधारला होता त्यामुळे फायझर व अॅस्ट्राझेनेका लशींचा संमिश्र वापर करण्याची गरज आहे.